अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; पाळधी नजीक घटना

0

जळगाव : मित्राच्या भेटीला जाणाऱ्या विकास भास्कर पाटील (वय ४२ रा शिवदत्त कॉलनी, जळगाव, मुळ रा. सनफुले, ता. चोपडा) यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने उडविले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता पाळधी, ता.धरणगाव येथील महामार्गावर घडली.

चोपडा तालुक्यातील सनपुले येथील मुळ रहिवासी असलेले विकास पाटील हे नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षापूर्वी जळगाव शहरातील चंदूअण्णा नगर परिसरातील शिवदत्त कॉलनी येथे स्थायिक झाले होते. एमआयडीसीतील सिध्दार्थ कार्बो या कंपनीत ते कामाला होते.

मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विकास पाटील हे बँकेच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडले. बॅकेत काम आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.१ सी.एल.१८९०) कंपनीतील मित्राला भेटण्यासाठी पाळधीकडे जात होते.तत्पूर्वी त्यांनी पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. पाळधी गावातील साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर १२. ३० वाजता एका भरधाव वाहनाने विकास पाटील यांना चिरडले.

वाहनचालक फरार
अपघातानंतर वाहनचालक पसार झाला होता. दरम्यान, अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास पाटील यांच्या कुटुंबियांना माहिती कळविण्यात येवून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलस नाईक संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी पंचनामा केला.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात येवून शून्य क्रमांकाने हा गुन्हा पाळधी पोलीसात वर्ग केला जाणार आहे. पाटील यांच्या पश्‍चात पत्नी पुष्पांजली, मुलगा तेजस व मुलगी स्नेहल असा परिवार आहे. तेजस याचे शिक्षण पूर्ण झाले असून तो खाजगी कंपनीत नोकरी करतो. तर स्नेहल ही बारावीला शिक्षण घेत आहे.घटनेची माहिती मिळाल्यावर सनफुले येथील नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.