जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे..!

0

 

लोकशाही संपादकीय

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाने महायुतीला फार मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महायुती विधानसभा निवडणुकीत एकसंघ राहण्याऐवजी त्यांच्यात जागावाटप करून फटाफुट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर विधानसभा निवडणूकत  तिरंगी- चौरंगी सामने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघांपैकी विद्यमान परिस्थितीत ४  भाजप, ५  शिंदे शिवसेना, १  काँग्रेस आणि १  अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस असे आमदार आहेत. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती राहणार नाही, एवढे मात्र निश्चित. कारण सहा विधानसभेत महाविकास आघाडी एकसंघ राहणार असून जागावाटपात सुद्धा त्यांचे एकमत होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील ११  पैकी सात मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. त्यात पाचोरा भडगाव मधून उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे वैशाली सूर्यवंशी, जळगाव शहर मधून माजी महापौर जयश्री महाजन, चाळीसगाव मधून माजी खासदार उन्मेष पाटील हे जवळजवळ निश्चित आहेत. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटातर्फे पारोळा एरंडोल मधून डॉक्टर सतीश पाटील, मुक्ताईनगर बोदवड मधून रोहिणी खडसे तर जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव देवकर हे तीन उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत. रावेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसपैकी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी निश्चित आहेत. बाकी अमळनेर, चोपडा, भुसावळ आणि जामनेर येथील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे निश्चित होणार आहेत. महायुतीच्या विद्यमान आमदारांपैकी भाजपच्या विद्यमान चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल की, नाही हे सांगता येत नाही. हे कारण जळगाव शहर विधानसभा  मतदार संघात विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या जागेवर रोहित निकम, डॉक्टर अश्विन सोनवणे, उज्वला बेंडाळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. बाकी जामनेर मधून मंत्री गिरीश महाजन चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण आणि भुसावळ मधून संजय सावकारे यांची नावे जवळजवळ निश्चित असली तरी भाजप या चार जागांवर समाधानी राहणार नाही. पाचोरा मतदारसंघातून भाजपने तालुका अध्यक्ष अमोल शिंदे तर रावेरमधून अमोल जावळे या दोन जागांवर उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे शिवसेनेत युती कायम राहिली तर शिंदे गटाला पारोळातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील, जळगाव ग्रामीण मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील तर चोपड्यातून विद्यमान लता सोनवणे अथवा त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे अशा तीन जागा. अमळनेर आणि मुक्ताईनगर या दोन जागांवर भाजपतर्फे उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री अनिल भाईदास हे राष्ट्रवादी बरोबर युती झाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. युती फिसकटली तर अनिल भाईदास पाटील यांना भाजपची ऑफर असेल, अन्यथा भाजपतर्फे माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपचे उमेदवार असतील. मुक्ताईनगरच्या जागेवर भाजपतर्फे उमेदवार देण्यात येणार असून येथील नाव मात्र अद्याप पुढे आलेले नाही.

 

एकंदरीत विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे ११ पैकी ८ जागांवर उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जळगाव शहर मतदार संघातून हमखास निवडून येणारे उमेदवार म्हणून विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जामनेर मतदार संघातून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री गुजरात राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भिवानी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. तरीसुद्धा ऐनवेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ११ जागांपैकी पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यमान शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना जर महायुतीत जागा मिळाली तर तेथे भाजपतर्फे अमोल शिंदे हे बंडखोरी करतील यात शंका नाही. कारण २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अमोल शिंदे यांचा पराभव थोड्या मतांनी झाला होता. तसे झाले तर तेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशीसह तिरंगी लढत अटळ आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार वाघ हे उमेदवार असल्यास चौरंगी लढतही होईल. विधानसभा निवडणूक अद्याप घोषित व्हायची आहे. तरीसुद्धा सद्यस्थितीत ‘आपल्यालाच उमेदवारी मिळेल’ म्हणून प्रत्येक जण कामाला लागला आहे. प्रत्यक्ष निवडणूक घोषित होऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर बंडखोरीचे चित्र स्पष्ट होणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.