दैनिक लोकशाहीचे ७० व्या वर्षात पदार्पण

0

विशेष संपादकीय २

 

दैनिक लोकशाही मुद्रित वृत्तपत्र प्रसार माध्यमाने ७० व्या वर्षात पदार्पण केले. ७० वर्षाचा कालावधी तसा मोठा म्हणता येईल. या ७० वर्षाच्या कालावधीत दैनिक लोकशाहीला अनेक चढउताराला सामोरे जावे लागले. अनेक संकटांना तोंड देऊन आपले कार्य पार पाडले. संकटे आली म्हणून न डगमगता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहिले. १९८० पासून टीव्ही चॅनल्सने फार मोठे आव्हान निर्माण केले. वृत्तपत्र या टीव्ही चॅनल्स पुढे टिकून राहतील की नाही, अशी सर्वच वृत्तपत्र चालकांना भीती वाटत होती. १९८० ते १९९० च्या दशकात टीव्ही चॅनल्सने धुमाकूळ घातला. वृत्तपत्रांवर त्याचा थोडा परिणामही झाला. तथापि चॅनल्सचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसू लागले. ही टीव्ही चॅनल्स पेक्षा मुद्रित वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची ठरली. यापुढे वाचक पुन्हा प्रसार माध्यमे म्हणून वृत्तपत्रालाच पसंती देऊ लागले. वृत्तपत्रांना प्रसार माध्यमातील विश्वासार्ह माध्यम म्हणून पहिली पसंती मिळाली. असे असले तरी प्रसारमाध्यमे वेळोवेळी बदलली. बदल हा सृष्टीचा नियम आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे गेल्या १५ ते २० वर्षापासून प्रसार माध्यमात डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचे एक युग सुरू झाले आहे. ज्याच्याकडे स्मार्ट मोबाइल आहे, ते सर्वांनी डिजिटल व सोशल मीडियाला अग्रक्रम देऊ लागले.

काळानुसार दैनिक लोकशाही वृत्तपत्र समूह माध्यमाने आमची दुसरी पिढी माझे सुपुत्र राजेश यावलकर यांच्या नेतृत्वात डिजिटल मीडियामध्ये ‘लोक लाईव्ह’ डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून यशस्वी पदार्पण केले. गेल्या दहा वर्षापासून लोक लाईव्ह डिजिटल पोर्टल बरोबरच सोशल मीडियाद्वारे स्वतःचे यूट्यूब चॅनल, फेसबुक लाईव्ह पेज, इंस्टाग्राम, टेलीग्राम आदीसह  दैनिक लोकशाहीची गतिमान वेबसाईट यशस्वीपणे कार्यरत आहेत. दैनिक लोकशाही वृत्तपत्राबरोबरच राजेश यावलकर यांनी गेल्या दहा वर्षांपासून दैनिक लोकशाहीच्या जळगाव मधील मुख्य कार्यालयात डिजिटल मीडियाचा स्वतंत्र विभाग अद्यावत स्वरूपात सुरू केला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घडलेल्या घटनांच्या बातम्या तातडीने लोक लाईव्ह पोर्टलद्वारे लोकांना वाचायला मिळतात. यामुळे दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध होण्याआधी वाचकांना आपल्या मोबाईलवर बातम्या घटना घडली त्याच दिवशीच वाचायला मिळतात. डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून अलीकडे सुकाळ निर्माण झाला आहे. कोणीही यावे टपली मारून जावे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे डिजिटल पोर्टल गल्लोगल्ली झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके डिजिटल पोर्टल गुणवत्तापूर्ण आहेत. त्यात लोकशाहीच्या लोक लाईव्ह पोर्टलचा समावेश होतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचे श्रेय संचालक राजेश यावलकर याला देऊ इच्छिते..

त्याचबरोबर सामाजिक, राजकीय नेते आणि कार्यकर्ते तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, नामवंत उद्योगपती, नामवंत डॉक्टर, यशस्वी विद्यार्थी, कृषी तज्ञ, यशस्वी शेतकरी यांच्या खास लाईव्ह मुलाखती घेतल्या जातात. यासाठी खास बंदिस्त एसी स्टुडिओ दैनिक लोकशाही कार्यालयात उभारण्यात आला आहे. दैनिक लोकशाहीचा हा स्टुडिओ आकाशवाणी स्टुडिओ नंतर दुसरा चांगला दर्जेदार स्टुडिओ म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुलाखती या स्टुडिओत घेतल्या गेल्या आहेत. सांगायचे तात्पर्य दैनिक लोकशाही वृत्तपत्र समूह केवळ वृत्तपत्र प्रसार माध्यमा पुरताच मर्यादित न राहता प्रसारमाध्यमातील सर्व प्रकारचे बदल समूहाने आत्मसात केले आहेत. त्यासाठी लागणारी दर्जेदार कॅमेरासह सर्वसाधारण सामग्री उपलब्ध आहे. ही सर्व माध्यमे खर्चिक आहेत. त्यासाठी तज्ञ स्टाफ आवश्यक असतो. सर्वच प्रसार माध्यमे सध्या खर्चिक बनले आहेत. तरीसुद्धा सामाजिक कार्याची जाणीव ठेवून लोकशाहीच्या लोक लाईव्ह चॅनलच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या लोकशाही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदानाचा टक्का वाढवा म्हणून, ‘चला हो मतदान करू चला..’ या गीताच्या माध्यमातून मतदान करण्यात प्रोत्साहन देण्यात येणारे सचित्र गीत सादर करून ते जिल्हाधिकारी अर्थात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले गेले. सदर लोकशाहीने सादर केलेले हे गीत निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अधिकृतपणे लाईव्ह सादर केले. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, हे विशेष होय. तुर्त एवढेच उद्याच्या अंकात ध्येय धोरणांवर चर्चा करू…!

सौ. शांता वाणी, संपादिका

Leave A Reply

Your email address will not be published.