चोपडा विधानसभा मतदारसंघात यंदा बदल होणार?

0

लोकशाही संपादकीय लेख 

२००९ पासून चोपडा विधानसभा मतदार संघ मागास जातीसाठी राखीव झाल्यानंतर २००९ ला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जगदीश वळवी हे निवडून आले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे शिवसेनेतर्फे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि सौ. लता सोनवणे या विजयी झाल्या. परंतु राष्ट्रवादीतर्फे २०१४ आणि २०१९ ला जगदीश वळवी पराभूत झाले. २०१४ ला प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे विजयी झाले आणि २०१९ ला चंद्रकांत सोनवणे यांना कोर्टाच्या अडचणीमुळे निवडणूक लढवता येत नसल्याने त्यांची पत्नी लता सोनवणे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली गेली आणि त्या निवडूनही आल्या. महाविकास आघाडीचे सरकार पडले तेव्हा लता सोनवणे सुद्धा शिंदे गटात सामील होत्या. दरम्यान त्यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द ठरवले. त्या सुप्रीम कोर्टात गेल्या अद्याप त्याचा निकाल लागणे बाकी आहे..

२०१४ ते २०२४ हे दहा वर्षे सोनवणे कुटुंबीयांची आमदारकीची सत्ता चोपडा विधानसभा मतदारसंघात असल्याने त्यांच्याबरोबर मतदार संघात अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली आहे.. त्यातच खोके घेऊन मूळ शिवसेनेशी गद्दारी केल्याने चोपड्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातर्फे त्यांचे विरोधात दंड थोपटण्यात आले आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत युती झाली तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत. शिंदे शिवसेनेच्या उमेदवारीचा पराभव करणे हा त्यांचा हेतू आहे. चोपडा मतदार संघात दहा वर्षात कोणतेही महत्त्वाचे मोठे विकासाचे प्रकल्प आलेले नाहीत. मतदार संघात सोनवणे कुटुंबीयांविषयी प्रचंड नाराजीचा सूर दिसून येतो आहे. तरी सुद्धा शिंदे शिवसेनेतर्फे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यंदाची निवडणूक लढविण्यास तयार आहे. तथापि त्यांना जात प्रमाणपत्राची अडचण आलीच, तर लता सोनवणे पुन्हा उमेदवार राहतील. लता सोनवणे यांनाही जात प्रमाणपत्राची अडचण आली तर चंद्रकांत सोनवणे यांचे लहान बंधू जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शामकांत सोनवणे यांना उमेदवारी दिली जाईल, असे आजचे चित्र आहे.

कोणत्याही परिस्थितीत चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत सोनवणे परिवारात उमेदवार राहतील एवढे मात्र निश्चित. सोनवणे कुटुंबीयांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील डी. पी. साळुंखे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार जगदीश वळवी यांना उमेदवारी दिली होती. परंतु जगदीश वळवी चोपडा मतदार संघात राहत नाहीत, म्हणून त्यांच्याविषयी चोपडेकरांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषदचे तत्कालीन सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी केली होती, म्हणून भाजपने त्यांना अंतर्गत पाठिंबा दिला होता. आता हे जगजाहीर झाले आहे. परंतु भाजपची बंडखोरी करून अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवणारे प्रभाकर गोटू सोनवणे मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत जर भाजप शिंदे शिवसेनेची युती झाली नाही, तर प्रभाकर गोटू सोनवणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील एवढे मात्र निश्चित.

डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी राज ठाकरेंच्या मनसेकडून निवडणूक लढवली होती. परंतु ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते. यंदा डॉक्टर बारेला अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने ते अजित पवार गटातर्फे निवडणूक लढविण्यास तयार झाले आहेत.

चोपडा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सेना भाजपची युती झाली तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथे उमेदवारी दिल्यास ते चांगली टक्कर देऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघात ही युती झाली तर राष्ट्रवादी पक्षातर्फे शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराशी जोरदार टक्कर देऊ शकतात. त्यामुळे यंदा चोपडा विधानसभा मतदारसंघात बदल होणार एवढे मात्र निश्चित. तरीसुद्धा चंद्रकांत सोनवणे अर्थात आमदार लता सोनवणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर सुरत-गुवाहाटी-गोवा गेल्या होत्या. त्यांच्यावर ५० कोटीचा आरोप लावला जातोय. त्यामुळे चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे पैशाला तोटा नाही. पन्नास खोकेतून पैशाचा महापूर मतदार संघात होईल. त्यामुळे चोपडा मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यंदा ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नेतेमंडळींची मोठी फौज आहे. माजी मंत्री अरुण भाई गुजराती, माजी आमदार व चोपडा सूत गिरणी संघाचे चेअरमन कैलास पाटील, ॲड. घनश्याम अण्णा पाटील आदींसारखे मातब्बर मंडळी आहे. त्यामुळे चोपडा विधानसभा मतदारसंघात जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळाली, तर राष्ट्रवादी बाजी मारू शकते. अजित पवार गटाचे डॉक्टर बारेला हे सुद्धा निवडणूक मैदानात उतरतील पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शरद पवारांच्या तुलनेत कमी आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.