अमळनेर विधानसभा मतदार संघ मंत्र्यांपुढे मोठे आव्हान..!

0

 

लोकशाही संपादकीय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.. २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालामुळे महायुतीला विशेषता भाजपला फार मोठा दणका बसलाय. “अबकी बार ४५ पार” असे म्हणणाऱ्या भाजप तसेच महायुतीला ‘जोर का झटका’ बसला. त्यामुळे अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार कंबर कसून मैदानात उतरले आहेत.. जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण होणार आहे. त्यापैकी आज येथे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे सिंहावलोकन करण्यात येत आहे. सध्या या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना राष्ट्रवादीतर्फे विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यांनी अपक्ष आमदार म्हणून २०१४ मध्ये निवडून आलेल्या शिरीष चौधरी या भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. शिरीष चौधरी यांचा पराभव कसा झाला, याचे विश्लेषण करण्याच्या खोलात न जाता यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे तिकीट मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यासाठी शिरीष चौधरींनी पूर्ण ताकद पणाला लावून तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार गटात गेलेले आमदार अनिल भाईदास पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आता महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे देऊळ पाण्यात आहे. त्यामुळे ‘अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार यांचेतर्फे निवडणूक लढवणार की, भाजपच्या कमळावर निवडणूक लढवणार?’ अशी द्विधा मनस्थितीत अनिल भाईदास पाटील यांची असल्याचे समजते. वास्तविक पाहता अनिल भाईदास पाटील हे मूळचे भाजपचे आहेत. भाजप तर्फे २०१९ ला शिरीष चौधरींना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि मतदार संघातील भाजपच्या गटबाजीचा फायदा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील यांना झाला. परिणामी जिल्ह्यात शरद पवारांच्या नेतृत्वात निवडून आलेले एकमेव राष्ट्रवादीचे आमदार ते बनले. परंतु राष्ट्रवादी फुटीमध्ये अनिल भाईदास पाटलांनी शरद पवारांचे नेतृत्व सोडून अजित पवारांच्या गटात जाऊन कॅबिनेट मंत्री पद जरी मिळवले असले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत “अनिल पाटील हे आमदार कसे होतात, ते पाहतोच..!” असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला असल्याने अनिल भाईदास पाटील यांचे समोर निवडणूक जिंकण्यासाठीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शड्डू ठोकल्यामुळे चुरस वाढली आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवून अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले कृषीभूषण साहेबराव पाटील हे निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्य बनले आणि त्यानंतर पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक बनले. “एकच वादा अजितदादा” या घोषणेचा उदो उदो करणारे साहेबराव पाटील यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. विरोधात विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील हे भाजपतर्फे तर शिरीष चौधरी यांनी अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली आणि साहेबराव पाटील तसेच अनिल पाटलांचा पराभव करून अपक्ष म्हणून शिरीष चौधरी निवडून आले. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शिरीष चौधरी हे भाजपचे सहयोगी सदस्य बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरीष चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यावेळी अनिल भाईदास पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवून ते विजयी झाले. आता अनिल भाईदास पाटलांसाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची वाट बिकट झाली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निवडणूक लढवणार असल्याचे कळते. साहेबराव पाटील आणि शरद पवार यांच्यात या संदर्भात गुप्त बैठकी झाल्याचे ही समजते. अमळनेर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष दावा करू शकतो. त्या दृष्टीने काँग्रेसचे नेते डॉक्टर अनिल शिंदे हे निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे कळते. तथापि अमळनेर तालुक्यातील काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याने तेथून काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल आणि येथे राष्ट्रवादी-राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो. जर महायुतीत अजित पवार गटाची युती झाली तर… परंतु जर अजित पवार-भाजप युती झाली आणि अनिल पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल भाईदास पाटलांना सहकार्य करणार नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची वाट बिकट आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.