लोकशाहीची ७० वर्षातील ‘निष्पक्ष वाटचाल’..!

0

 

विशेष संपादकीय-३

वृत्तपत्र चालवणे ही सध्या तारेवरची कसरत म्हणावी लागेल. दै. लोकशाही ७० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.. त्याचे सर्व श्रेय आमच्या वाचकांबरोबर जाहिरातदार आणि विक्रेते बंधूंकडे जाते. ७० वर्षाचा कालावधीत हा पार मोठा आहे. ७० वर्षात अनेक चढ-उतार आले, परंतु आम्ही खंबीरपणे त्याचा मुकाबला केला. परंतु प्रसार माध्यमांची जी ध्येयधोरणे दै. लोकशाहीने स्वीकारली, त्यापासून तसुभरही ढळलो नाही. आपल्या भागातील विकासाला केंद्रबिंदू मानून वाटचाल केली. कुठल्याही आमिषाला बळी न पडता पीत पत्रकारितेला थारा दिला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची टोपी लोकशाहीने घातली नाही. सतत जागत्याची भूमिका पार पाडली. अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याची भूमिका कायमच घेतली. महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील सत्ताधारी सरकारचे चुकत असेल तर त्यावर प्रहार करून त्यांच्या चुका दुरुस्त होईपर्यंत सत्ताधारी पक्षावर सतत अंकुश ठेवण्याचे कार्य दै. लोकशाहीतर्फे सातत्याने केले आहे. सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही दै. लोकशाहीने केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला दै. लोकशाहीने नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. सर्वसामान्य पीडित, वंचित, दलित, आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत पाठपुरावा करण्याची लोकशाहीची भूमिका राहिली आहे. मी एक महिला असल्याने महिलांच्या प्रश्नांची, त्यांच्यापुढे असलेल्या समस्यांची जाणीव असल्याने महिला सक्षमीकरणासाठी सतत पाठपुरावा करण्याची लोकशाहीची भूमिका आहे. महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. स्त्री पुरुष समान हक्क यांचा पाठपुरावा आम्ही करतो. कारण पुरुषांप्रमाणे सर्वच क्षेत्रात महिला कार्य करू शकतात, किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त प्रामाणिकपणे महिला कार्य करतात. त्यामुळे चूल आणि मूल जुन्या रूढींना तोडून दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून महिलांमध्ये सुधारणा झाली तर अख्खे कुटुंब सुधारते. कुटुंब सुधारले तर देश सुधारतो, ही लोकशाही भूमिका आहे.

 

सध्या सर्वत्र तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या बेकारीची समस्या आ वासून उभी आहे. बेकारीमुळे त्रस्त झालेला तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतोय. ही महाराष्ट्र तसेच देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब होय. त्यासाठी बेकार तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून मुकाबला करायचा असेल तर त्यांना स्वयंरोजगाराकडे वळवणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी जे मार्गदर्शक तत्वे असतील ते या बेकार तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी दै. लोकशाही आग्रही आहे. आपल्या भागाचा विकास झाला तर समृद्धी नांदते, हे सूत्र लक्षात घेऊन खोळंबलेल्या विकास प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दै. लोकशाहीतर्फे सतत वाचा फोडली जाते. सिंचनाचे प्रमाण वाढले तर शेतीतील उत्पन्न वाढून शेतकरी समृद्ध होतो. म्हणून जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सिंचनाचे प्रकल्प जसे पाडळसरे धरण, गिरणा नदीवरील बलून बंधारे, मेगा रिचार्ज प्रकल्प, बोदवड परिसर सिंचन प्रकल्प, हातनूरचे वाढीव आठ दरवाजे, वाघुर धरणापासून बंदिस्त पाईप द्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे, ही कामे गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याचा फायदा फक्त ठेकेदार राजकीय पुढारी आणि अधिकारी वर्गांना होतोय. वर्षानुवर्षे प्रकल्प त्यांच्यासाठी चराऊ कुरण बनले आहे. ते प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दै. लोकशाहीतर्फे वारंवार वाचा फोडण्याचे काम केले आहे. राजकारण हा समाजाचा एक अंग बनला आहे. राजकारणातून समाजकारण केले जाणे ही अपेक्षा असताना राजकारण हे स्वतःच्या विकासाचे माध्यम बनले आहे. सध्या राजकारणाचा स्तर घसरला आहे. त्यात सुधारणा होण्यासाठी दै. लोकशाहीतर्फे राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले जात आहे, हे इथे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. सध्या महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिलांवरील वाढते अत्याचार थांबले पाहिजे. त्यासाठी जनतेतून चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. अशा चळवळीला प्रोत्साहित करण्याचे, त्याला बळ देण्याचे काम लोकशाही दैनिकाकडून दिले जाईल, असे आश्वासन देऊन गेल्या ७० वर्षात दै. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते आणि थांबते…!

 

सौ. शांता वाणी, संपादिका

Leave A Reply

Your email address will not be published.