पारोळा (प्रतिनिधी) :पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाची पोखरा योजना कार्यान्वित आहे. या योजनेत गावपातळीवरील समिती गठीत केलेली असते. या समितीवर तालुक्यातील कृषी सहाय्यक हे सचिवपदी तर गावाचे ग्रामसेवक हे सहसचिव पदी असतात.
या समितीवर कृषी सहाय्यक नसल्यास सचिव पदाची जबाबदारी सहसचिव म्हणून ग्रामसेवक हे पार पाडीत असतात. या समितीच्या बैठकीत सचिवाचे व सहसाचीवाचे काम मिटिंग लावणे, आलेली प्रकरणे म.अध्यक्षांच्या परवानगीने मंजूर करणे व मिटिंगचे कामकाज पार पडणे हि कर्तव्ये असतात. सदर योजनेची गावात मिटिंग लावणे हे ग्रामसेवकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच महिन्यांपासून या समितीच्या बैठका होत नाहीत.
त्यामुळे सदर योजनेतील पात्र शेतकरी हे योजनेपासून वंचित राहत आहेत. यामुळे बळीराजाची यामुळे चांगलीच गैरसोय होत आहे. शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत गावपातळीवरील समितीच्या बैठका त्वरित घेण्यात याव्यात अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली आहे.