मेहुणबारे येथे महा रयत च्या संचालकांवर गुन्हे दाखल ,मात्र ना. सदाभाऊ खोत यांच्या मुलाचे नाव आरोपात नाही

0

चाळीसगाव ‌| प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील शेतकरी वर्गाची महा रयत ऍग्रो इंडिया लिमिटेड कंपनीकडून शेती पूरक व्यवसाय म्हणून कडकनाथ कोंबडी पालनाचा करार करून उत्पादित अंडी व पक्षी चढ्या भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी मेहुनबारा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर संबंधित कंपनीच्या संचालकांवर संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला .

याबाबत अधिक माहिती अशी की राज्यभर कडकनाथ कोंबडी पालनाच्या नावाने या कंपनीने अनेक शेतकर्‍यांना गंडा घातला असून या फसवणूकीची चौकशी ईडी मार्फत करण्याची मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. या प्रकरणात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीवाचे नाव समोर येत असल्याने राज्यभर या महा रयत कंपनीचे नाव उजेडात आले व एकच खळबळ उडाली आहे. मेहुनबारा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मात्र नामदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीवाचे नाव आरोपी म्हणून दिसून येत नाही.

या प्रकरणात फसवणूक झालेले बहाळ येथील शेतकरी सूर्यकांत भगवान चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेती पूरक व्यवसाय व भरघोस उत्पन्न मिळण्याची हमी दाखवून आरोपी यांनी बारा शेतकऱ्यांकडून 21 लाख 23 हजार रुपये कराराप्रमाणे मालाची उचल न करता फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात आरोपी म्हणून कंपनीचे संचालक सुधीर शंकर मोहिते ,मंगेश नार्वेकर, संदीप शंकर मोहिते ,हेमंत सुभाष जमदाडे ,साधना हेमंत जमदाडे, प्रशांत कांबळे, सचिन पवार ,महेश कदम, विजय शेंडे, गणेश शेवाळे, प्रियांका संदीप मोहिते, संध्या विजय शेंडे ,संचालक महा रयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व रयत ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याप्रकरणी मेहुनबारा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.