पंजाब मेलला १०९ वर्षे पूर्ण ; भारतातील सर्वात जुनी ट्रेन एलएचबी कोचसह

0

भुसावळ (प्रतिनिधी)- पंजाब मेल या भारतीय रेल्वेवरील सर्वात जुन्या ट्रेनला १०९ वर्षे पूर्ण होत असून दि. १.६.२०२१ रोजी ११० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.  दि. २२ मार्च २०२० पासून कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असल्या तरी अनलॉक झाल्यावर दि. १.५.२०२०  पासून  विशेष गाड्या म्हणून या सेवा पुन्हा हळूहळू सुरू केल्या गेल्या.  तथापि, पंजाब मेल विशेष गाडी दि. १.१२.२०२० पासून एलएचबी कोचसह सुरू करण्यात आली. एलएचबी डबे प्रवाशांना अधिक सुरक्षा आणि सुखद प्रवासाचा अनुभव देतात.

पार्श्वभूमी

मुंबई ते पेशावर चालणा-या पंजाब मेलची सुरूवात खरे म्हणजे अस्पष्ट आहे.  १९११ च्या अंदाजपत्रक कागदपत्राच्या आधारे आणि दि. १२ ऑक्टोबर, १९१२ रोजी ‘दिल्ली येथे यायला काही मिनिटांनी ट्रेनला उशिर झाले’ याविषयी प्रवाशांने केलेल्या तक्रारीवर आधारित पंजाब मेलने दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटल्याचा (सुरू झाल्याचा) अंदाज  करण्यात आला आहे.

पंजाब मेल हि ग्लॅमरस फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांनी अधिक जुनी आहे.  बॅलार्ड पियर मोल स्टेशन खर म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी  एक केंद्र होते.  पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड तेव्हा तिला संबोधन केले जात होते, शेवटी १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली. प्रारंभी,  पी आणि ओ स्टीमर्स आणि वसाहती भारतात प्रथमच पोस्टिंग झालेले सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नीसमवेत मेल मधून आणले जात होते.  साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालायचा.  ब्रिटिश अधिकारी  मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी अंतर्देशीय रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीने प्रवास करीत.

पंजाब लिमिटेड निश्चित टपाला दिवशी मुंबईच्या बल्लार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे, सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे. ट्रेनमध्ये सहा डब्यांचा समावेश असे.  तीन प्रवाशांसाठी आणि तीन टपाल माल आणि टपालासाठी. तीन प्रवासी डब्ब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ प्रवाशांची होती. चमचमते सर्व डब्बे एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर  कार) होते आणि डबे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले गेले. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी  असल्याने  गाडयांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा असत त्यामध्ये लॅव्हॅटरीज, बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, सामानासाठी एक डबा आणि एक डबा गो-या साहेबांच्या नोकरांकरीता असे.

फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटीश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता आणि पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता.  १९१४ पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व  आगमन होऊ लागले.   त्यानंतर  ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याची दैनिक सेवा सुरू झाली.

मुख्यत: उच्च वर्गाच्या गो-या साहेबांच्या सेवेपासून पंजाब मेलने लवकरच निम्न वर्गातही सेवा पुरवायला सुरुवात केली.  १९३० च्या दशकाच्या मध्यापासून पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डब्बे दिसू लागले.  १९१४ मध्ये, मुंबई ते दिल्ली हा जीआयपी मार्ग सुमारे १,५४१ किमीचा होता. हे अंतर ही ट्रेन २९ तास व ३० मिनिटात पूर्ण करीत असे.

१९२० च्या दशकाच्या सुरूवातीस, सुमारे अठरा थांबे असूनही प्रवासाची वेळ कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आली. १९७२ मध्ये, प्रवासाची वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढविण्यात आली. २०११ मध्ये पंजाब मेलला तब्बल ५५ थांबे होते. सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा जोडण्यात आला. दि. १.५.१९७६ पासून पंजाब मेल डिझेल इंजिनासह धावू लागली. (पूर्णतः  डिझेलवर)

थळ घाटाच्या विद्युतीकरणानंतर, रेल्वे बॉम्बे व्हीटी ते मनमाड पर्यंत इलेक्ट्रिक इंजिनासह चालविण्यात येऊ लागली, तेथून डब्ल्यूपी क्लास स्टीम इंजिनने चालविण्यात येत होती. मनमाड पासून पार फिरोजपुर पर्यंत ही गाडी डब्ल्यूपीसह चालविण्यात येत होती. १९६८ मध्ये सदर ट्रेन झांसीपर्यंत डिझेल वर चालविली जाऊ लागली तसेच लोडिंग १२ पासून १५ डब्ब्यांपर्यंत वाढले. डिझेलीकरण नंतर झांसी ते नवी दिल्ली, त्यानंतर १९७६ मध्ये  फिरोजपूर पर्यंत वाढविण्यात आले.

झाशी येथे दोन डब्यांची भर पडत डब्यांची  संख्या १८ करण्यात आली.  १९७० च्या उत्तरार्धात अथवा इ.स. १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धात, पंजाब मेल चालविण्यासाठी डब्ल्यूसीएएम/1 ड्युअल करंट लोकोमोटिव्ह इगतपुरी येथे डीसी ते एसी ट्रॅक्शन बदलून  भुसावळ पर्यंत इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालविले जात असे.

पंजाब मेल मुंबई ते फिरोजपूर कँटोन्मेंट दरम्यान १९३० कि.मी. चे अंतर कापण्यासाठी ३४ तास आणि १५ मिनिटे घेत असे.  ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनासह धावत आहे. आता  रेस्टॉरंट कारची जागा पेंट्री कारने घेतली आहे.

सध्या विशेष पंजाब मेलमध्ये एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ पेंट्री कार, ५ सामान्य द्वितीय आसन श्रेणीचे डब्बे आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.