धरणगाव स्टेट बँकेचा अनागोंदी कारभार

0

धरणगाव (प्रतिनिधी) :– येथील स्टेट बँक शाखेच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक हैराण झाले आहेत. सातत्याने होणारा त्रास निमूटपणे सहन करणाऱ्या जनतेला जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल? यासाठीच स्टेट बँकेची धरणगाव शाखा कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , बँकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. अगदी नियोजनशून्य कारभार यानिमित्ताने पहावयास मिळतो. बँक कर्मचारी ग्राहकांशी बोलतांना अरेरावी करतात. जिल्ह्यातील कुठल्याही शाखेच्या वेळेत बदल झालेला नाही परंतु धरणगाव SBI च्या शाखेच्या वेळेत मात्र बदल झाला आहे. सकाळी 9:३० ला बँक सुरू होते. हा बदल कसा केला गेला आहे याबाबत कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाहीये. साधं पासबुक प्रिंटिंग आणि बारकोड साठी लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागते. बँकेत विचारणा केली असता काउंटरवर असलेला व्यक्ती नवीन आहे म्हणून जास्त वेळ लागतोय अशी बेजबाबदार उत्तरे मिळतात. लोकांना त्यांचे हक्काचे पैसे ठेवणं आणि काढण्यासाठी देखील अनेक मनमानी कारभाराला तोंड द्यावे लागते. म्हातारी माणसं , महिला यांना खूप जास्त त्रास यानिमित्ताने होतोय. बँकेच्या कामानिमित्ताने येणारा व्यक्ती आपला पूर्ण दिवस जाणार या भावनेनेच बँकेत येतो. याचाच अर्थ असा की जो व्यक्ती २०० रुपये रोजाने कामाला जातो आणि त्याला बँकेतून ५०० रूपये काढावयाचे असतील तर त्याला फक्त ३०० रुपये मिळणार कारण त्यांचा १ दिवसाचा रोजगार हमखास बुडणार यात शंका नाही. तालुका पातळीचे गाव असतांना देखील राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा अगदी मर्यादित आहेत त्यातच स्टेट बँकेत नेहमीच पहावयास मिळते ती मरणाची गर्दी..!  देशाची वाटचाल डिजिटल इंडिया कडे होत असतांना जर इथे लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी दिवसभर बँकेत उभे रहावे लागत असेल तर ही बाब नक्कीच चिंतनीय आहे.

बँकेला विचारावयाचे काही महत्वपूर्ण प्रश्न..! १) बँकेच्या वेळेत बदल कोणाच्या अधिकृत परवानगीने केला? बँकेत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे का? जर असेल तर कामात वेग का दिसून येत नाही? काही अडचण निर्माण झाल्यास उत्तर देण्यासाठी अधिकृत चौकशी केंद्र आहे का? बँकेत सुरक्षा रक्षक चोख कामगिरी बजावतो का? अनेक ग्राहक असतांना गर्दीतील सर्व ग्राहकांचे समाधान करण्यासाठी चांगली व्यवस्था आहे का? बँक सरकारी असली म्हणजे तिच्या कारभारावर नियंत्रण नसते का?  बँकेच्या सद्यस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे का? अशा साध्या प्रश्नांची उत्तरे बँकेने द्यावीत हीच सामान्य ग्राहकांची अपेक्षा आहे. जोपर्यंत कोणी चुकीच्या गोष्टीचा प्रतिकार करत नाही तोपर्यंत ते तसंच घडत राहत. सामान्य ग्राहकांच्या सोयीसाठी बँक असते..! एवढी साधी गोष्ट लक्षात येऊन बँकेच्या स्थितीत सुधारणा व्हावी एवढी माफक अपेक्षा बँकेच्या ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.