देशव्यापी बंदला जळगावात चांगला प्रतिसाद

0

जळगाव  : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला व्यापारी, दुकानदार, सर्वच घटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी बंदमुळे सकाळी दहापर्यंत दुकाने सुरू केली नव्हती. व्यापारी संकूलात मात्र सकाळी दुकाने सुरू झाली. नंतर ती आंदोलकांनी बंद पाडली.

भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच डावे पक्षही सहभागी झाले होते. लोकसंघर्ष मोर्चा व कामगार संघटना सयुंक्त कृती समिती, रिक्षाचालकांची संघटना, हमाल मापडी संघटना यांना बंद सर्व पुरोगामी संघटना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादी पक्ष व लोकसंघर्ष मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सकाळी टॉवर चौकात एकत्र जमले.

तेथे पदाधिकाऱ्यांनी दोन गटांचे विभाजन केले. एक गट फुले मार्केट, गोलाणी मार्केट, सराफ बाजार, दाणा बाजार परिसरात दुकाने बंद करण्यासाठी निघाला. दुसरा गट नवीपेठ, टॉवर चौक परिसर, कोर्ट चौक, जी.एस.मैदान, स्टेडीअम कॉम्पलेक्स, एस.टी.स्टॅड परिसरातील दुकाने बंद करीत होता.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मुकुंद सपकाळे, अभिषेक पाटील, शरद तायडे, गफार मलिक, श्याम तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जमील शेख, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील , वंचीत आघाडीचे भारत सासणे, छावा संघटनेचे अमोल कोल्हे, बहूजन क्रांती मोर्चाचे विजय सुरवाडे, समाजवादी पार्टीचे साजिद शेख, माळी महासंघाचे शाळिग्राम मालकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विजय पवार, ॲड. सचिन पाटील, सचिन धांडे, विष्णू भंगाळे, प्रा. करीम सालार आदी संघटनांचे प्रतिनिधींनी बंदचे आवाहन करीत व्यापारी संकूले बंद केली.

 

पोलिसांचा बंदोबस्तही होताच. बंदचे आवाहन करीत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचले. तेथे सभा घेण्यात आली. केंद्र शासनाच्या निषेध करून कृषी विधेयक रद्द करा अशी मागणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.