देशभरात शिवजयंतीचा उत्साह

0

मुंबई/नवी दिल्ली  : आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय शिवजयंती निमित्त उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे तिथीनुसार जयंतीला शिवनेरीवर येत असतात. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार जयंतीला येणार आहेत. मुंबई, पुण्यासह दिल्लीमध्येही शिवजयंतीचा कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा होणार आहे.

नवी दिल्लीतील शिवजयंतीचं राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवभक्तांनी दिल्लीमधल्या शिवजयंती उत्सवला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आलं आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आलेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विक्रमी सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. या उपक्रमात 400 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये चाळीस मिनिटांमध्ये 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यरात्री 12 वाजता पाळणा झुलवत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच डोळ्याचे पारणे फेडणारा हा जन्मोत्सव सोहळा ठरला. हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. अतिशय आकर्षक असलेल्या या रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

मुंबई- पुणे असा दररोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडून सिंहगड एक्सप्रेसमध्ये अनोख्यापद्धतीने शिवजंयती साजरी केली. अकोल्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे गेल्या आठवडाभरापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच स्पार्क फाऊंडेशनच्यावतीनं तीन दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं.

शिवजयंती मिरवणुकीची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू आहे. या मिरवणुकीत 1 हजार ढोल ताशा वादक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महिलाशक्तीचा अनोखा जागर खास आकर्षण ठरतय. वाद्यावर ताल धरलेल्या या वादकांची तालीम जोरात पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.