कारागृहातून ‘त्या’ कैद्यांना पळवून नेणाऱ्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी

0

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा कारागृहातील सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून तिघा कैद्यांना दुचाकीवरून पळवून नेणाऱ्या जगदीश पुंडलिक पाटील (वय-१८, रा. पिंपळकोठा ता.पारोळा) याला गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री (जि. धुळे) येथून अटक केली. दरम्यान, आज न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, कारागृहातील कैदी सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील (दोन्ही रा. अमळनेर) दोन्ही दरोडा, दंगलीच्या गुन्ह्यात, तर सुशील अशोक मगरे हा बडतर्फ पोलिस कर्मचारी पुणे येथील सराफी दुकानात गोळीबार करून लूट केल्याप्रकरणी कारागृहात होता. तिन्ही संशयितांनी २५ जुलैस सकाळी कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून सिनेस्टाइल पलायन केले होते. या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता. त्याच्यासोबत एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते. दरम्यान या तिन्ही कैद्यांना पळविण्यास मदत करणारा संशयित आरोपी जगदीश पाटील हा रविवारी रात्री पारोळा येथून सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर त्यांनी धुळे, साक्री येथील पोलिसांशी संपर्क साधून संशयित आरोपी धुळे साक्री रोडवर जगदीश याला ताब्यात घेण्यात आले.

सहा दिवस पोलीस कोठडी

संशयित आरोपी जगदीश पाटील याला आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.