हिंगणा येथे जलयुक्त शिवाराची घागर उताणी; शासनाचा खर्च मातीमोल

0

बोदवड (प्रतिनिधी) :- तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून विविध प्रकारची कामे झालेली आहेत.यात सिमेंट नाला बांध,खोलीकरण,साठवण बंधारे आदी कामांचा समावेश आहे.मात्र यातील सिमेंट नाला बांधांची अवस्था दयनीय असून तालुक्यातील हिंगणा येथे करण्यात आलेला सिमेंट नाला बांध अत्यंत निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे.त्यामुळे येथे शासनाचा कोट्यावधींचा खर्च मातीमोल झाल्याचे दिसत आहे.

राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे,शेतीसाठी संरक्षित पाणी साठा निर्माण करणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे,लोकसहभागातून गाळ काढून पाणी साठा वाढविणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे तसेच पावसाचे पाणी गावशिवारातच अडविणे हे जलशिवार योजनेचे उद्दिष्ट आहे. या उद्देशपुर्तीसाठी अभियान यशस्वी करण्यावर भर देण्याचा कटाक्ष आहे.असे असतानाही ही योजना बोदवड तालुक्यातील हिंगणा येथे सपशेल अपयशी ठरलेली आहे.

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा कटाक्ष असतानाही बोदवड तालुक्यात ही योजना कागदावरच फलद्रूप झाल्याचे चित्र दिसत असून वास्तविक परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे.

तालुक्यातील हिंगणा येथे सन २०१८-२०१९ या वर्षातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौथ्या टप्प्यातील सिमेंट नाला बांध जुलै २०१९ मध्ये मंजूर असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते त्यावेळी बंद ठेवण्यात आले होते.मात्र तरीही संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सदरचे काम दि.६ मार्च २०२० ते आजपर्यंत रात्रीच्या सुमारास १२:०० ते पहाटे ४ च्या सुमारास हे काम करीत असल्याचे आढळून आल्याने दि.८ रोजी सदर कामाच्या ठिकाणी पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी पाहणी करून संबंधित जबाबदार अधिकारी यांच्याकडून पंचनामा करण्यात आला असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यात मोठं मोठं दगड,निकृष्ट दर्जाचे सिमेंट,रेती यांसह कोणत्याही प्रकारची महसूल कर न भरता बांधकाम सामुग्री वापरल्याने पाहणीत आढळून आले आहे.तसेच संबंधित ठेकेदार यांनी जबाबदार अधिकारी यांना विचारात न घेता तांत्रिक बाबी धाब्यावर बसवून सदरचे काम सुरू केले असल्याचे यावेळी आढळून आले.

सदरचे सिमेंट नाला बांध ९ लाख ११ हजार रुपयांचा असून हे काम चाळीसगाव येथील मुळ शासकीय कंत्राटदार राहूल जगन्नाथ चौधरी यांच्या नावावर असून पोट ठेकेदार म्हणून हे काम जळगाव येथील संजय वराडे नामक व्यक्ती करीत असल्याचे सांगण्यात आले.एकदंर सदरचे काम म्हणजे शासनाच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

दि.८ रोजी प्रत्यक्ष सदरच्या स्थळी जाऊन पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड,रवींद्र पाटील उपविभागीय अभियंता जलसंधारण उपविभाग मुक्ताईनगर जिल्हा परिषद जळगाव,जलसंधारण उपविभाग मुक्ताईनगर अधिकारी मयुर कोकाटे,जलसंधारण अधिकारी जे.एस.विसपूते यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामांची पाहणी करून पंचनामा केला आहे.त्यामुळे तालुक्यातील हिंगणा येथे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येत असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामांची पोलखोल झाली असून संबंधित ठेकेदार यांच्यावर होणा-या कारवाई कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे

Leave A Reply

Your email address will not be published.