बंगालमधील विद्यमान भाजप आमदाराचा संशयास्पद मृत्यू

0

कोलकाता: पश्‍चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान आमदार देवेंद्रनाथ राय हे आज त्यांच्या निवासस्थानाजवळच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील हेमदाबाद भागात त्यांचे निवासस्थान आहे. तेथेच ते मृतावस्थेत आढळले असून याप्रकरणी भाजपने सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राय हे हेमताबाद मतदारसंघातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये गेले होते. तथापि, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. आम्ही या प्रकाराचा तातडीने तपास सुरू केला असल्याची माहिती जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, राय यांची हत्या झाली असून त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी असाच आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे की राय यांचा अतिशय थंड डोक्‍याने खून करण्यात आला आहे. ज्या राज्यात आमदारही सुरक्षित नाहीत त्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाची बाबच शिल्लक राहिलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल कॉंग्रेसच्याच गुंडांनी त्यांची हत्या केली असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीस यांनी केला आहे. भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या हत्या हा बंगाल मधला नित्याचाच प्रकार झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे नेते कनिलाल आगरवाल यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस त्यांच्या हत्येचा तपास करीत आहेत आणि त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण उघड होईलच.

Leave A Reply

Your email address will not be published.