मार्च अखेर प्रलंबित कामे पूर्ण करावे -अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जळगाव: जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी सोमवारी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत, ग्रामपंचायत, बांधकाम, समाज कल्याण, सिंचन, महिला व बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागातील कामांची स्थिती व निधी खर्च याबाबत चर्चा झाली.
अतिरिक्त सीईओ रणधीर सोमवंशी यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्चअखेर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. निधीचा योग्य वापर करत विकासकामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीला जि.प.चे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, बांधकाम अभियंता एस. बी. पाटील, समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे आणि कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी उपस्थित होते.