धानोरा येथील जि. प. मराठी शाळेची दुरवस्था

0

शासनाच्या निधीचा दुरुपयोग; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

दिलीप महाजन/ धानोरा ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासनाने या सर्व शाळा डिजिटल करण्याकरिता कंबर कसली आहे. या माध्यमातून शाळांना स्मार्ट टि.व्ही. संगणक, पिण्यासाठी शुद्ध पाणी आदी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु परिसरातील काही शाळांची अद्यापही दयनीय अवस्था असल्याने शासनाच्या निधीचा दुरुपयोग होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला असल्याने यावर शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. यामध्ये शाळा खोल्यांची दुरुस्ती, वाल कंपाउंड,नवीन इमारत,स्वच्छता गृह, यासह अनेक प्रकारची कामे शासन ठेकेदारकरवी पूर्ण करून घेत असते. कामांसाठी मंजूर झालेल्या निधीमधून ठेकेदार थातुरमातुर आपले काम करून मोकळे होतात. काही महिन्यातच या कामांचा खेळ खंडोबा होत असतो.

शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक उपलब्ध करून देण्यात आले असले तरी ते अद्यापही शाळांमध्ये वीजच नसल्याने ते धूळ खात पडलेले दिसून येतात.

शाळांमध्ये दरवर्षी लाखो रुपये खर्च करून स्वच्छता गृह बांधकाम केले जातात. परंतु याठिकाणी शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवसात यांचा वापर सार्वजनिक मुतारी म्हणून सुरू होतो.

धानोरा येथील जि.प. शाळांच्या इमारत जुनीआहे . ती पूर्णपणे जीर्ण झाली असल्याने काहिठिकानी त्या वापरासाठी बंद केल्या असल्या तरी शाळेचे विद्यार्थी त्याच ठिकाणी खेळतात त्यामुळे या जीर्ण इमारती निर्लेखीत करून पाडण्याची परवानगी जिल्हा परिषदेने दिली पाहिजे.

अनेक शाळांमध्ये तारेचे तर कुठे जाळीचे कुंपण बसविण्यात आले आहे. परंतु हे बसवून सुद्धा त्याठिकाणी अज्ञातांनी ते कम्पाउंड तोडून थेट शाळेत जाण्याचा मार्ग बनवला आहे. यामुळे आजही या शाळा कम्पाउंड असूनही असुरक्षितच आहेत. शासनाने कम्पाउंड वर केलेला खर्च कुठे तरी वाया जाताना दिसतो.
अनेक शाळांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची वणवण पहावयास मिळते. शाळांमध्ये विविध निधीच्या अंतर्गत पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवल्याचे कागदोपत्री दाखवून निधी लाटण्याचे प्रकार दिसून येतात.

मराठी शाळांमध्ये दररोज संध्याकाळ पासून अवैध धंदे करणारे गर्दी करतात. हे लोकं याठिकाणी बिडी, सिगारेट, दारूच्या बाटल्या येथेच टाकून जातात सकाळी शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना येथे स्वच्छता करावी लागते. परंतु कधी कधी शाळेत विद्यार्थ्यांना या दारूच्या रिकाम्या बाटल्या, अर्धवट पडलेले बिडी सिगारेटचे तुकडे पडून दिसून येत असल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. यासाठी या अवैध धंदे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.