युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे जळगावात आगमन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज जिल्हा दौर्‍यावर आले असून जळगावात त्यांचे आगमन झाले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात ठिकठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद या नावाने त्यांच्या यात्रा सुरू आहेत. या अनुषंगाने आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र ऐन वेळी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. यानंतर ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे घोषित करण्यात आले. या अनुषंगाने ते आज सकाळी जळगाव विमानतळावर दाखल झाले.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जळगाव विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. दरम्यान, जळगावात आकाशवाणी चौकात शिवसेना आणि युवासेनेतर्फे ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर, शिरसोली आणि वावडदा मार्गे ते पाचोरा तालुक्यात दाखल होणार आहेत. सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिल्दी, गोराडखेडा येथील स्थानिक शिवसैनिक स्वागत करणार आहेत. सामनेर येथुन ५०० मोटरसायकलची रॅली वरखेडी नाक्यापर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर ते मोठ्या ताफ्यासह भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर महाराणा प्रताप महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन व हुतात्मा स्मारकास भेट देतील. तसेच यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाजवळ शिवसंवाद साधणार आहेत.

यानंतर आदित्य ठाकरे यांचे एरंडोल येथे भव्य स्वागत होणार आहे. येथून ते धरणगाव येथे जाणार असून तेथेही ते शिवसैनिक आणि युवासैनिकांशी संवाद साधणार आहेत. तेथून पारोळा येथे शिवसंवाद साधल्यानंतर ते धुळे येथे रवाना होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.