भुसावळ

तालुका हद्दीत रेल्वे रुळावर अज्ञात ट्रेनच्या धडकेत एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालय भुसावळ यांच्या माहितीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रेल्वे पोल क्रमांक 440/A ते 440/04 दरम्यान अप-लाईन आणि डाऊन-लाईनच्या मधील खडीवर एका 25 ते 30 वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मेमोद्वारे पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. ट्रेनच्या धडकेमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवला. दि. 1 ऑगस्ट रोजी प्राप्त मेमोवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, तर या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार संजय भोई करत आहेत. या मृत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


