जळगाव : शहरातील ओम नगर परिसरातील एका तरुणाला बनावट मोबाईल अॅपच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय धर्मराज चव्हाण (वय ३५, रा. ओम नगर, जुना खेडी रोड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. १७ जानेवारी २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने विजय चव्हाण यांना ‘आधार केवायसी अपडेट’ या नावाने एक संशयास्पद फाईल पाठवली होती. सदर फाईलवर एसबीआय योनो अॅपसारखा लोगो असल्याने विश्वास बसून त्यांनी ती फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली.
फाईल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईल व बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम तर लंपास केलीच, शिवाय संबंधित मुदत ठेव (एफडी) परस्पर मोडून संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यात वळवण्यात आली. या प्रकारात एकूण ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. बँक खात्यातील रक्कम अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच विजय चव्हाण यांनी तातडीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपीविरोधात तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंक, फाईल किंवा अॅप इन्स्टॉल करू नये तसेच ‘केवायसी अपडेट’सारख्या संदेशांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post