शहर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : पैशांच्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना कानळदा रस्त्यावर घडली. या हल्ल्यात अकील शेख अजगर (वय 25, रा. खडकी चाळ) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तन्या उर्फ तन्वीर शेख (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकील शेख हे त्यांचा मित्र जाफर शेख जलील याच्यासोबत कानळदा रस्त्यावरील एका प्लास्टिकच्या दुकानाजवळ उभे असताना संशयित तन्या उर्फ तन्वीर शेख तेथे आला. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून त्याने अकील यांच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर, तू मला पैसे दिले नव्हते, आता तुला बघतो, अशी धमकी देत कमरेला खोचलेला चाकू काढून अकील शेख यांच्यावर वार केला. या हल्ल्यात अकील शेख यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर अकील शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तन्या उर्फ तन्वीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.



