लोहारा ता. पाचोरा
लोहारा मार्गे आंबेवडगाव रस्त्यावर कळमसरा-कुऱ्हाड टी पॉइंटवर आज सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान दुचाकी व ओमनी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण समाधान लक्ष्मण क्षीरसागर व एक महिला, रा. लोहारा, ता. पाचोरा, हे गंभीर जखमी झाले. त्यांना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आल्याचे समजते. तर ओमनी चालक कळमसरा येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी गेल्याचे कळते.
एमएच-१९ सीएफ-०६४८ क्रमांकाची ओमनी पहूर येथून कळमसरा मार्गे कुरंगी या गावी जात होती. तर एमएच-१९ डीआर-९६६६ क्रमांकाच्या प्लॅटिना दुचाकीवरून तरुण समाधान लक्ष्मण क्षीरसागर व महिला लोहारा येथून आंबेवडगाव मार्गे कोल्हे येथे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अपघाताची भीषणता घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आली. चारचाकी ओमनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धडकेमुळे ओमनी चालकाच्या दरवाजाजवळ रक्तस्त्रावाचे मोठे डाग दिसून आले. तसेच इतर ठिकाणीही जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ती मोडतोड अवस्थेत ब्रास नालीमध्ये पडली होती.
अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे, शांतीलाल पगारे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले यांनी घटनास्थळाची पाहणी करून औट पोस्टला दोन्ही वाहने आणून ताब्यात घेतली आहेत.

