
लोकशाही न्यूज नेटवर्क
ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने संपर्कात आलेल्या एका तरुणीची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राधानगरी, कागल आणि भुदरगड परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी अवघ्या एका तासात चार संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुरगूड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने ओळखपत्र तयार करण्यासाठी मुख्य संशयित आदित्य शेटके याला स्वतःचे छायाचित्र पाठवले होते. त्यानंतर ओळखपत्र तयार झाल्याचे सांगून त्याने तिला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले. पुढे ओळखपत्र मुरगूड येथे असल्याचे कारण देत तिला दुचाकीवरून शहरालगतच्या एका निर्जन ठिकाणी नेले.
तेथे तिच्या छायाचित्रांचा गैरवापर करून अश्लील व्हिडिओ तयार करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विविध ठिकाणांवरील लॉजमध्ये नेऊन तिचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले आणि त्या आधारे तिला ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, या चित्रीकरणाच्या आधारे तिला इतर संशयितांच्या संपर्कात राहण्यास भाग पाडण्यात आले. संशयित रणजित मुधोळकर, प्रणवगिरी पालकर आणि विक्रम पाटील यांनीही वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पीडित तरुणीने सोमवारी रात्री मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य बाजीराव शेटके, रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील या चौघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत.

