वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील एका तरुणाने आजोबांच्या तेराव्याच्या दिवशीच हतनूर जलाशयावरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. ३० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथील झुलेलाल किशोर कोळी (वय ३२) यांच्या आजोबांच्या तेराव्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी कोणालाही काहीही न सांगता आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ बीएस ९६२८) घरातून प्रस्थान केले. ते थेट हतनूर धरणाजवळील तापी नदीवरील पुलावर गेले. तेथे दुचाकी पुलाच्या कडेला उभी करून त्यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोधमोहीम राबवून सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत झुलेलाल कोळी यांच्यावर रात्री सुमारे १०.३० वाजता दर्यापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे.


