शिरूर जि. पुणे

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारीवर येत काही वेळी जीव देखील घेतला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशात सोशल मीडियावर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट तरुणाने एक्सेप्ट केली नाही. या क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. यात तरुण जखमी झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. एका तरुणाला सोशल मीडियावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. मात्र फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या क्षुल्लक कारणावरून २१ वर्षीय तरुणावर चार ते पाच अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. पाठलाग करत मारहाण करण्यात आली आहे.
फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्यामुळे संतापलेल्या अल्पवयीनमुलांच्या टोळक्याने टाकळी हाजीतील २१ वर्षीय तरुणाला निर्दयीपणे मारहाण केली. लाठ्या-काठ्यांनी बेदम चोप देत जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्हीत टिपलेले दृश्य अंगावर काटा आणणारे ठरत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा गंभीर सवाल उभा राहिला आहे.
या हल्ल्यात अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याने सोशल मीडियाच्या अतिरेकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणाऱ्या मुलांच्या टोळक्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.


