…तर योगींचा सिद्दीकी होईल !

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धमकी देणारी महिला अटकेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाहीतर त्यांचाही बाबा सिद्दीकी केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरवरून हा मेसेज केला गेला आहे. या धमकीच्या मेसेजनंतर योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांचा बाबा सिद्दीकी करू असे मेसेजमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दि. 12 ऑक्टोबरला वांद्रे पूर्व येथे तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई असल्याचे समोर आले होते. त्यासोबतच या प्रकरणात पोलिसांनी 8 ते 9 जणांना अटक केली असून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला एक महिनाही झाला नसताना थेट योगींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता धमकी देणाऱ्याचा सिद्दीकींच्या हत्येशी काही संबंध आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधी मार्च महिन्यामध्ये लखनऊमधील महानगर येथील नियंत्रण कक्षामध्ये योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. रात्रीच्या वेळी दहा वाजता 8889991916 या नंबरवरून धमकीचा फोन आला होता. योगींना बॉम्बने उडवले जाईल, असे धमकी देणाऱ्याने फोन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला म्हटले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारले कोण बोलत आहे तर समोरून फोन ठेवण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेल, फोन आणि मेसेज वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या महिलेची ओळख पटवली असून तिला अटक करून चौकशी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय महिलेला अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

धमकी देणारी महिला कोण?

फातिमा खान असे या महिलेचे नाव आहे. महिला सुशिक्षित असून तिने माहिती तंत्रज्ञान विषयात बीएससी केले आहे. फातिमा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात कुटुंबासह राहते. अधिकाऱ्याने सांगितले की, तिचे वडील लाकूड व्यवसाय करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.