वड्री पाडा रस्त्याने अवैध सागवान जप्त, वन विभागाची मोठी कारवाई
यावल तालुका प्रतिनिधी: यावल वन विभागाच्या पूर्व आणि पश्चिम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे.
सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक प्रमुख स्वप्नील फटांगरे यांच्या आदेशानुसार गस्ती पथकाने .25 रोजी तातडीने कारवाई केली. यावल पूर्व, यावल पश्चिम विभागाचे कर्मचारी आणि संरक्षण मजूर यांनी शासकीय वाहनाने वड्री पाडा रस्त्यावर गस्त घालत असताना एका नाल्यात बेवारस अवस्थेत लपवलेले 20 सागवान चोपट नग आढळून आले.
गस्ती पथकाने 20 सागवान चोपट नग (0.420 घन मीटर) अंदाजे किंमत 5,660 रुपये जप्त केले. हा लाकूडसाठा शासकीय वाहनाद्वारे मूळ वनविभाग केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला असून यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक यावल वनविभाग जमीर शेख, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे समाधान पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम स्वप्निल फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत श्री. रमेश थोरात, बी. बी. गायकवाड, प्रकाश बारेला, श्रीमती वर्षा बडगुजर, सीमा भालेराव, अश्रफ तडवी, जितू सपकाळे, सचिन तडवी, अमोल पाटील, विलास बारी, सचिन चव्हाण आणि श्री. तडवी यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना वनसंरक्षणाचे आवाहन
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही वन गुन्हा किंवा अवैध वृक्षतोड आढळल्यास स्थानिक वनअधिकारी किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर तातडीने संपर्क साधावा. आपल्या परिसरात अवैध वृक्षतोड सुरू असल्यास वन विभागाला माहिती कळवावी, असेही सांगण्यात आले आहे.