महिला वाहकाकडून मनमानी कारभार
यावल आगार व्यवस्थापकांना निवेदन
चुंचाळे प्रतिनिधी यावल आगारातून मोहरद-चुंचाळे मार्गे यावलकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये चुंचाळे बसथांब्यावरील शालेय विद्यार्थिनींना बसू न दिल्याची गंभीर घटना १२ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. कार्यरत असलेल्या महिला वाहकाच्या या मनमानीमुळे ग्रामीण विद्यार्थिनींना वेळेवर शाळेत पोहोचण्यास मोठा त्रास सहन करावा लागला, परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या संदर्भात दैनिक लोकशाहीचे चुंचाळे प्रतिनिधी सुपडू संदानशिव यांनी व मृणाली चौधरी, योगिता साबळे, यज्ञा पाटील, नंदिनी चौधरी या विद्यार्थिनींसोबत थेट यावलचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. एमएच २० बीएल १६४१ क्रमांकाच्या बसमधील संबंधित महिला वाहकावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत वेळेवर पोहोचता न आल्याने शिक्षणाचे नुकसान होत आहे. याची गंभीर दखल घेत आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तातडीने संबंधित वाहक व चालकाला पाचारण केले. महाजन यांनी त्यांना, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सक्त समज दिली .
तसेच, यावल आगारात सध्या बसेसची कमतरता असली तरी, लवकरच नवीन बसेस प्राप्त होणार आहेत. त्यामुळे मोहरद-चुंचाळे मार्गावर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच नवीन यावल नायगांव सकाळी ९:३० वाजता एसटी बससेवा सुरू करणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी विद्यार्थिनींना दिले आहे, अशी माहिती आगर प्रमुख महाजन यांनी सुपडू संदानशिव यांच्या सोबत बोलतांना दिली.