पुस्तक: एक चिरंतन ठेवा

0

लोकशाही विशेष लेख 

आज मोबाईल फोन  खिशात अगदी आपल्या जवळ ,आसपासच असतो. तसे पूर्वी हातात पुस्तक असायचे. आरामखुर्ची, हातात अमृततुल्य चहाचा कप, कानानेआकाशवाणीचे श्रवण व दुसऱ्या हातात अमृतासम गोडी असणारं सुंदर पुस्तक असा थाट असायचा.कारण आयुष्याला निवांतपणा  होता.  भगिनी वर्गही घरातील काम करून दुपारी वामकुक्षी घेताना सहज म्हणायच्या, “वाचता वाचता डोळा लागला”. वाचनाने लागणाऱ्या या भावसमाधीच आता कोणाला अप्रूप राहिले नाही कारण त्याची अनुभूती नाही. आज 23 एप्रिल 2025 ‘जागतिक पुस्तक’ दिनाच्या निमित्ताने ‘पुस्तकांची अपूर्वाई’ आपण आठवूया व एक  सुखद सहल त्याच्यासोबत करूया. हे पुस्तक आपल्याला पुस्तकाच्या पानात हळुवार ठेवलेले मोरपीस, त्याचा स्पर्श पुन्हा प्रत्ययाचा आनंद आपल्याला खचितच देतील. आपण सुखावून जाऊ. आनंदाचा तरंग आपल्या अंतरंगात सहज उमटेल.

व्यक्तीचं वेगळेपण हे त्याच्या छंदातून प्रगट होत. प्रत्येकाचे छंद वेगळेवेगळे असतात.काहींना पशुपक्षी- पाळीव प्राणी पाळायची खूप हौस असते. पानाफुलात रमणारी व्यक्ती गच्चीवरची बाग करते. काहींना पर्वत -शिखरे, दरी -डोंगर खूणवत असतात ते ‘पर्यटन प्रेमी’असतात.काही जण खाओ और खिलाओ यातील पाककुशल तज्ञ असतात. काही चित्रकार तर काही गायक. तर थोडी शांत,एकांतप्रिय कोणाच्या अध्यात नको मध्यात नको अशी व्यक्ती पुस्तकांच्या बरोबर! वाचन हाच तिचा छंद. इतर छंदांच्या मानाने वाचनाचे साधन ‘पुस्तक’ असल्याने त्याचा फारसा त्रास नसतो.कमी जागेत, कमी खर्चात आजूबाजूला आवाज न करता ही पुस्तक आपलं काम करत असतात. म्हणजे पुस्तक अशी बहुगुणी असतात, ज्ञानाचे सागर असतात व अगदी बालपणापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत ते आपल्याला सोबत करतात.

‘आई कमळ बघ’ पाठ्यपुस्तकातील या धड्यासोबतच पुस्तकाचा परिचय होतो व दिवसेंदिवस तो वाढत जातो.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,वळणावर ते आपल्या सोबत राहतात. “चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का?” या चांदोबाची आपण जितकी आतुरतेने वाट पाहत असायचो तितकीच वाट महिन्यातून एकदा येणाऱ्या ‘चांदोबाची’. पुस्तक रूपात भेटणारा हा चांदोबा जिवलग मित्र. त्यातील रंगीबेरंगी सुंदर चित्र , दृष्ट रामू शामू व विक्रमाच्या पाठीवर लोंबणारा वेताळ मनाला भीती दाखवायचा. पण गोष्टी वाचण्याची मेजवानी तहानभूक विसरायला लावायचे असा हा लाडका चांदोबा त्याचं काम करून गेला. पुढे आले सवंगडी म्हणून ‘कुमार’, ‘किशोर’ चे अंक याशिवाय अकबर-बिरबल च्या गोष्टी, तेनालीरामच्या गोष्टी शिवाय ईसापनितीतील गोष्टी रामायण महाभारतातील गोष्टी यांनी शहाणपणाच्या व चातुर्याच्या गोष्टी शिकविल्या. त्यामुळे आईला पाठीवर रट्टा मारावा लागला किंवा बाबांना कान पकडावा लागला नसावा. पुस्तक नकळत घडवितात ते असे. संस्कार वर्गाला न जाता संस्कार घडत गेले.

वयाप्रमाणे अभिरुची बदलत जाते. आपल्या जाणिवा, अनुभवविश्व राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक अनेक आयामांना दखल घेत जातात व या प्रक्रियेत पुस्तक फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कारण आयुष्यात  आपण काही सगळं वाचू शकत नाही.  तो वेडेपणा ठरेल. त्यामुळे काही मान्यवर साहित्यिकांच्या दर्जेदार निर्मितीचा आस्वाद आपल्यापुरता आपण घेऊ शकलो तर खूप काही कमावलं असं होतं. म्हणून काही पुस्तक मग आपल्या हृदयात कायमच घर करतात तर काहींचा स्मृतिगंध कायम दरवळत राहतो यात श्री. ना. पेंडसे यांची ‘पडघवली’ असेल तर ‘हद्दपार’असू शकेल. भालचंद्र नेमाडे यांचे ‘कोसला’ असेल किंवा राजकीय संदर्भ असलेले अरुण साधू यांची ‘सिंहासन” किंवा ‘मुंबई दिनांक’ असेल. तर अंतर्मुख करायला लावून हास्याचे कारंज उडवणारी पु.ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ असो किंवा वसंत कानिटकरांचा ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे पुस्तक असो. पुस्तक जादूगर असतात त्या काळात त्या परिस्थितीत त्या भावविश्वात नेऊन पोहोचवितात. म्हणून तर पुढे ही पुस्तक नाटक, सिनेमा,नाट्यछटा यात सहज प्रवेश करतात व रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतात. जसा सध्या गाजत असलेला ‘श्रीमान योगी’ चित्रपट.

वयाच्या चाळीशी नंतर संसारातील त्याच त्या सुखदुःख मिश्रित कथा, तोच कोलाहल, गदारोळ, भावभावनांचे प्रदर्शन या साऱ्याचा सुज्ञ  वाचकाला कंटाळा येतो.  त्याला काहीतरी अधिक दर्जेदार व थोडे शाश्वत अशा भावभावनांना कवेत घेणार काही वाचावे असे वाटत राहते व मग हातात येतात ती शांतरसात व चिरंतन शाश्वत मूल्यांची प्रामाणिक असलेली पुस्तक  ‘मोगरा फुलला’, ‘तु का आकाशाएवढा’, ‘शांतीब्रह्म एकनाथ’ किंवा ‘दास डोंगरी राहतो’ या कादंबऱ्या एक परिसर स्पर्श देऊन जातात.

अशी पुस्तक त्यातील पानही हुकमी एक्का असावा तशी काम करतात. ती आपल्याला जिंकून देतात की नाही हे ठाऊक नाही पण जगण्याची उमेद मात्र निश्चित देतात. वाचनाचा छंद हा सर्वश्रेष्ठ ठरावा असाच आहे. पुस्तकांसह केलेला हा आपला जीवन प्रवास अधिक प्रगल्भ,परिपक्व, पारदर्शक, प्रांजल होत तो परिपूर्णतेच्या वाटेवर आपल्याला आणून सोडतो.

पन्नाशीच्या उंबरठ्यावर ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’, ‘गाथा’ हे हातात आले तरी जीवनाचे अनमोलपण अधिक जाणवते. मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसं,दिवसा काठी काहीतरी वाचावे व लिहावे. आपण जेवण जसे करतो तसे हे निश्चितच. पण हे वाचन मोजक व नेमस्त असे असावे त्याचा अतिरेक नसावा. पुस्तकांच्या प्रकाशात आपली जीवन यात्रा उजळून जाते. ‘वाचाल तर वाचाल’हे सर्व अर्थाने सत्य आहे म्हणून आपल्या सुंदर वास्तुत  एक कपाट पुस्तकांचे अवश्य मात्र हवे.  सहज उठावे कपाट उघडावे पुस्तकातले पान वाचावे ही आपली संस्कृती समजून आपण ती जपावी. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण आपल्या पुरती ती प्रतिज्ञा पुस्तकांबाबत प्रयत्नपूर्वक पालन करूया. ठीक ठिकाणी रसिक वाचक ‘पुस्तक भिशी’, ‘पुस्तक वाचन’, ‘पुस्तक मैफल’ असे विविध पातळीवरचे कार्यक्रम साजरे करतात. त्यांना मिळणारा प्रतिसाद आजही भरघोस असतो. पुस्तकांचे आपल्यावर असलेले ऋण आपण त्याची परतफेड  करू शकत नाही.  ते आपली सोबत कधी सोडत नाही. एखाद  वेळी आपली मुलं पंख फुटले की विदेशात, परदेशात जातील पण उतार वयातही ही पुस्तक आपली मित्र बनून राहतील. सुख,समाधान, शांती व आनंद बहाल करतील. अशी ही साठा उत्तराची पुस्तकाची कहाणी सफल संपूर्ण.

 

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.
Leave A Reply

Your email address will not be published.