लोकशाही संपादकीय लेख
देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष, तसेच राज्य पातळीवर राज्य महिला आयोग अध्यक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. परंतु महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदाची कारकीर्द सतत वादग्रस्त ठरली आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यापेक्षा त्यांच्या निर्णयात सतत राजकारण प्रेरित असल्याचा वास येतो. महिला आयोगाच्या अध्यक्षपदा बरोबरच त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षपदही भूषवतात. हे दोन पद उपभोगतांना रूपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून पक्षाला जे फायदेशीर असेल त्या दृष्टीने प्रेरित होऊन काम करत आहेत. विरोधी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात जर एखादी गोष्ट त्यांना दिसली तर त्या मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होईल अशीच भूमिका घेतात. गेल्या एक वर्षातील काही बाबींवर प्रकाश टाकला तर त्या कशा राजकीय हेतूने प्रेरित होऊन टीका करतात, हे सर्व सामान्यांना ही स्पष्ट कळते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राज्य महिला अध्यक्ष रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांचे तर जणू वीळा भोपळ्याचे नाते असल्यासारखे वागतात. काही महिन्यांपूर्वी त्या जळगावला त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी आल्या असता रोहिणी खडसेंच्या पक्षात काम करणाऱ्या एका व्यक्तीचे पत्नीशी भांडण झाले. हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून त्याला रोहिणी खडसेंनी कामावरून काढून टाकले. त्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांच्या भांडणासंदर्भात पोलीस स्टेशन गाठले. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. परंतु रूपाली चाकणकरांनी जळगावी आल्यावर त्या महिलेचा अर्ज घेऊन रोहिणी खडसेंनी तिच्यावर अन्याय केला म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन रोहिणी खडसेंवर टीका करून त्यांचे चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न केला. त्या पिडीत महिलेला आयोगाकडून कसला न्याय दिला हे मात्र गुलदस्त्यातच राहीले. केवळ राजकारणाने प्रेरित होऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करणे हा एकमेव उद्देश त्यांचा असतो. त्यावेळी सुद्धा दैनिक लोकशाहीने याच स्तंभातून लिहिले होते. त्यानंतर रोहिणी खडसे यांच्या पतीचे तथाकथित रेव पार्टी संदर्भात प्रांजल खेवलकर यांच्यावर एकही गुन्हा नसताना त्यांना आरोपी नंबर एक पोलिसांनी केले. परंतु प्रांजल खेवळकरांच्या फोन मध्ये अनेक महिलांचे अश्लील फोटो काढले म्हणून पोलिसांच्या आधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन रोहिणी खडसे आणि त्यांचे पतीवर हल्लाबोल केला. परंतु प्रांजल खेवलकरांच्या वैयक्तिक जीवनात जाऊन टीका करण्याचा आतताईपणा करून त्या तोंडावर पडल्या. त्याचबरोबर आताचे ताजे प्रकरण फलटणच्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात तर रूपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकांसमावेत पत्रकार परिषद घेऊन गळफास घेतलेल्या डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या की हत्या याचा पोलीस शोध घेण्यापूर्वीच तिचे चारित्र्य हनन करणारे वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रुपाली चाकणकरांचा निषेध होतो आहे. खुद्द अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या ऍड. रूपाली पाटील यांनी सुद्धा रूपाली चाकणकरांचा निषेध केला हे विशेष होय.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या सुपारीबाज महिला अध्यक्ष आहेत अशी अनेक पुराव्यानिशी शिवसेना उभाटा गटाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी केला आहे. डॉक्टर संपदा मुंडेची आत्महत्या की हत्या याचा पोलीस शोध घेण्यापूर्वीच रूपाली चाकणकर न्यायाधीशांची भूमिका घेऊन डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्याच होय.. असा जावई शोध लावल्याचे कारण काय? डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूपूर्वी तीन महिन्यांच्या आधी लिहिलेल्या चार पानी पत्रासंदर्भात चौकशी समितीचा अद्याप निर्णय यायचा आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचे चार पानी पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले होते. परंतु गळफास घेतली तेव्हा तिच्या हातावर लिहिलेल्या चार ओळी हे तिचे हस्ताक्षर नाही, हे स्पष्ट असताना तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरील पत्राचा उल्लेख करतात. परंतु तिची आत्महत्या पूर्वी आरोपीचे हे कृत्य असावे हे सरळ सरळ स्पष्ट दिसत असताना त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याबाबत रूपाली चाकणकर ब्र बोलत नाहीत. आरोपींना सरळ सरळ वाचविण्यासाठी त्या असे वक्तव्य करत आहेत. पीडित संपदा मुंडे यांच्या माता पिता कुटुंबीयांना भेटण्याची ही आवश्यकता चाकणकरांना वाटू नये? हा निर्दयीपणा नव्हे काय? त्यांचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाऊन डॉक्टर संपदा मुंडेच्या आई वडील व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे साधन केले. त्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिली, तेव्हा रूपाली चाकणकरांना ही थप्पड नव्हे काय? फलटणमध्ये पोलीस स्टेशन समोर सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. रूपाली चाकणकरांनी स्वतः होऊन महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे; त्या सोडत नाहीत तर त्यांची अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी करावी, ही जनतेची अपेक्षा आहे..!