
लोकशाही संपादकीय लेख
सध्या महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत खालच्या थराला जाऊन पोहोचले आहे. महायुतीचे सरकार अस्तित्वात येऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर आले. विरोधक तर फक्त नावालाच उरले आहेत. तरीसुद्धा महायुती सरकार मधील भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील नेत्यांमध्ये एकमत होत नाही. सत्ता हातात असताना विरोधी पक्षाची त्यांना भीती वाटण्याचे कारण काय? बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजले. मंत्री धनंजय मुंडेंवर वारेमाप आरोप होत असताना सुद्धा त्यांना तीन महिन्यानंतर राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे या न्यायासाठी लढा देत आहेत. त्यांची सत्ताधारी साधी दखल सुद्धा घेत नाहीत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी करुणा मुंडेंची साधी बाजू देखील समजून घेतली नाही. मंत्री संजय राठोड यांनी पूजा नामक तरुणीवर अत्याचार केल्याने पूजाने आत्महत्या केली. अशावेळी महिला आयोग अध्यक्षांनी मात्र पूजाची बाजू समजून घेतली नाही. अशी अनेक उदाहरणे महिला आयोगाच्या संदर्भात देता येतील. महिला आयोग अध्यक्षांकडून महिलांच्या समस्या सोडविणे कमी, परंतु राजकारण करण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो आहे, असे म्हणावे काय? नुकतेच ताजे पुणे येथील घडलेल्या वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणी महिला आयोग बॅकफूटवर आहे. परंतु जिथे राजकारण करायचे असेल तिथे तथाकथित पीडित महिलेला हाताशी धरून आपण विरोधकांना कसा त्रास देता येईल अथवा विरोधकांचे राजकारण कसे संपवता येईल, अशी कृती करीत असतील तर त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडून देऊन सरळ सरळ राजकारण करावे.
काल महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी जळगावला आल्या होत्या. एक वर्षांपूर्वी सीमा पांडुरंग नाफडे या विवाहित तरुणीचे आणि तिचा नवरा पांडुरंग नाफडे यांच्यात कुटुंबिक वाद झाले. पती पांडुरंग नाफडे हा आर्थिक भ्रष्टाचार केलेला फरार आरोपी आहे. 2023 पर्यंत तो राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे नोकरीला होता. त्याने केलेल्या आर्थिक भ्रष्टाचारामुळेच रोहिणी खडसे यांनी त्याला दोन वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. आता त्यांचा त्याच्याशी कसलाही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु वर्षभरापूर्वी भांडण झाल्यानंतर पोलिसात तक्रार पत्नी सीमाने दिली होती. कारण काय तर रोहिणी खडसे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा तिच्यावर दबाव होता. अर्थात पांडुरंग नाफडे दोन वर्षापासून रोहिणी खडसेंकडे नोकरीला नसल्यामुळे रोहिणी कडून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीमा नाफडेवर दबाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे खुद्द रोहिणी खडसे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
वर्षभरापूर्वी सीमाने महिला आयोगाकडे अर्ज केल्यानंतर भुसावळ येथे तिचे तीन ते चार वेळा महिला आयोगातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर तिने फैजपूर येथील स्टेशनला तक्रार (एनसी) दाखल केली. त्या तक्रारीत रोहिणी खडसेंच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा नाही. परंतु काल महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची आणि सीमा नाफडे यांची भेट झाल्यावर राजकारणाला सुरुवात झाली आणि सीमाने पत्रकार परिषद घेऊन त्यात नवरा पांडुरंगा नाफडे सोबत रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दबाव येत असल्यामुळे वर्षभरात मी तक्रार दाखल केली नाही, आता माझ्या तसेच माझ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करूनच मला न्याय मिळवण्यासाठी मी पोलिसात तक्रार दाखल करते आहे, असे सांगितले. अर्थात सीमा नाफडेंचा ‘बोलविता धनी’ कोण आहे. हे न समजण्यात इतके लोक दुधखुळे नाहीत. परंतु ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे सीमा नाफडेंचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय, तथापि त्यातून सीमा नाफडेला न्याय मिळण्याऐवजी तिची नाहक बदनामी होईल एवढे मात्र निश्चित..
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना सीमा नाफडेला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर असे राजकारण करून तिला तो न्याय मिळणे शक्यच नाही. यातून रूपाली चाकणकर या आपल्या विरोधक राजकारण्यांना संपविण्यासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्या खालच्या थराला जाऊन एक महिला नेत्या दुसऱ्या महिला नेत्याच्या विरोधात राजकारण करतात. याबाबत चाकणकरांची कीव करावीशी वाटते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असताना चाकणकर आणि रोहिणी खडसे एकाच पक्षात होत्या. आता त्यांचे पक्ष बदलले आहेत. रोहिणी खडसेंना शरद पवार गटाच्या राज्याच्या महिला अध्यक्ष पद दिले आहे. एका पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून जिथे जिथे चाकणकर राजकारण करतात, त्याबाबत तिथे तिथे रोहिणी खडसेंकडून हल्लाबोल होतो.
एवढेच नव्हे तर महिलांच्या समस्या सोडविण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन राजकारण करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची अध्यक्षपदावरून हकलपट्टी करावी, अशी जाहीर मागणी करणाऱ्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात महिलेला हाताशी धरून तक्रार करायला लावून रोहिणी खडसे यांना त्रास देण्याचा प्रयत्न चाकणकर करणार नाहीत तर नवल. पण राजकारणाचा उपयोग करत असताना एका सर्वसामान्य महिलेचा आपण बळी घेतोय, याचे भान चाकणकरांनी ठेवणे आवश्यक आहे. याप्रकरणी रोहिणी खडसे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे पुराव्यानिशी मांडले आहेत. चाकणकरांचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला. तसेच आपल्या अब्रूला धक्का पोहोचविला म्हणून सीमा नाफडे विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा त्या करणार आहेत…!

