अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव – कोरोना महामारी आणि चिकुनगुनियासारख्या साथींच्या संकटांचा आपण सर्वांनी मिळून यशस्वी सामना केला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम केले. त्याच अनुभवाच्या बळावर योग्य नियोजन, पूर्वतयारी आणि समन्वयातून दुष्काळी परिस्थितीवरही निश्चित मात करता येईल. मात्र त्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी ओळखून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कर्तव्यात हलगर्जीपणा किंवा विनापरवानगी गैरहजेरी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
पारोळा तहसील कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व या मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारोळा, एरंडोल व भडगाव तालुक्यांतील विविध विभागांची प्रशासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता, शेतीपंपांचा वीजपुरवठा, पीकविमा, पीक नुकसानीचे पंचनामे, जलसंधारण, भूजल पातळी, रोजगार हमी योजना, शेतकरी कर्जमुक्ती, घरकुल योजना आणि विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दुष्काळात सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसतो. त्यामुळे संकट तीव्र होण्याची वाट न पाहता आतापासूनच पाणीटंचाई निवारण, विहिरींची दुरुस्ती, जलसंधारण आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना गती द्यावी. जनतेशी बोलताना तोंडात गोडवा ठेवून काम करा,
शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. ट्रान्सफॉर्मर, केबल, फ्यूज आणि वीजपुरवठ्यातील बिघाड तातडीने दूर करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा 24 तास सतर्क ठेवावी. तसेच जल जीवन मिशनअंतर्गत 75 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देऊन उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत. प्रलंबित वीजजोडण्यांसाठी महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत 181 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. मात्र यावर समाधान न मानता पुढील काळातील गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन करावे. पाण्याची सुविधा असलेल्या योग्य शासकीय जमिनींवर तसेच वनविभागाच्या जमिनींवर चारा लागवडीचे नियोजन करा. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची कमतरता भासणार नाही, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करावी. डेंग्यू व इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी गावांमध्ये आणि बाजारपेठ परिसरात आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे आयोजित करावीत. तसेच पोलीस विभागाने रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रशासकीय कामकाजाचे सादरीकरण
बैठकीत प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी विविध विषयांचे सविस्तर सादरीकरण केले. पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील आणि भडगावच्या तहसीलदार शीतल सोलट यांनी आपापल्या तालुक्यांतील पीकविमा, नुकसानीचे पंचनामे, शेतकरी कर्जमुक्ती, रोजगार हमी योजना, पेरणी, पर्जन्यमान, पीककापणी प्रयोग, भूजल स्थिती, पाणंद रस्ते, घरकुल योजना, महसूल समाधान शिबिरे आणि सेवा संकल्प अभियानासह विविध कामांची माहिती सादर केली. यावेळी महसूल, कृषी, महावितरण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, वन, आरोग्य, जलसंधारण, ग्रामपंचायत व नगरपालिका आदी विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

