
लोकशाही संपादकीय लेख
महिनाभरापूर्वी जळगावच्या शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दोन राजकीय गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. ही हाणामारी एवढी विकोपाला गेली की पोलिसांना शेवटी लाठीमार करावा लागला. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनमध्ये कायद्याचे दिंडवडे निघाले आणि दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्या दोघेही गटांपैकी अद्याप एकाही गटावर कारवाई झाली नाही. हे प्रकरण ताजे असतानाच याच पोलीस स्टेशन मधील नाईक विनोद अहिरे यांना तीन दिवसांपूर्वी एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. ज्या पोलीस स्टेशनमध्ये लोकांचे संरक्षण होते तेथे लाच घेऊन काम करण्याचा कित्ता गिरवला जातो. येथे नाईक विनोद अहिरे यांनी जी लाच घेतली ती लाच वैयक्तिक घेतली नसेलच.. शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना लाच घेणाऱ्या नाईक विनोद अहिरे यांनी सांगितले नसेल का? तेव्हा या लाच प्रकरणात नाईक विनोद अहिरे बडतर्फ आणि पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची बदली, अशाने प्रश्न सुटणार आहेत का? नाईक विनोद अहिरेला बडतर्फ केले आहे. किमान पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना बदली ऐवजी निलंबित तरी करायला हवे होते. येथे प्रश्न येतो तो कावेरी कमलाकर यांच्या लाचे मध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही, मग त्यांना निलंबित अथवा बडतर्फ कसे करायचे? परंतु पोलीस स्टेशन मधील आपल्या हाताखाली असलेल्या नाईक विनोद अहिरे यांनी लाच घेतली म्हणजे याचा अप्रत्यक्ष संबंध पोलीस निरीक्षकाचा येतोच. त्याप्रमाणे त्यांना किमान निलंबित करायला हवे होते. त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली म्हणजे ही काय फार मोठी सजा देण्याचा प्रकार नाही. पंधरा दिवस, एक महिना नियंत्रण कक्षात काढायचे आणि त्यानंतर दुसरे ठिकाणी परत आपली बदली करून घ्यायची, असा प्रकार होतो. त्यामुळे नियंत्रण कक्षातील बदली विषयी आज-काल कोणालाही काही वाटत नाही. निलंबित केले असेल तर अर्ध्या पगारावर नोकरीत राहणे कसे असते याची जाणीव झाली असती. त्यातच कोर्टाच्या फेऱ्या मारल्या असत्या तर त्याची झळ त्यांना बसली असती. निलंबित केल्यानंतर सुद्धा लवकरात लवकर केसचा निकाल लागून पुन्हा नोकरीवर येता येते. तरी पण बदली ऐवजी निलंबित करणे हे थोडेसे त्रासदायकच ठरले असते. याचा अर्थ नाईक विनोद अहिरे यांना बडतर्फ करायला नको होते, असा नाही. त्यांना प्रत्यक्ष एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले गेले असल्याने त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई योग्यच आहे. तरी बडतर्फ झाल्यानंतर सुद्धा पुन्हा नोकरीत समाविष्ट कसे व्हायचे हे त्यांना सर्व माहीत असते. सहा महिन्यांचा कालावधी गेला की ते पुन्हा कोर्टाच्या माध्यमातून कामावर हजर होतील. एकंदरीत लाच घेणारा अधिकारी लोकांची काय सेवा करणार हे त्यातून स्पष्ट दिसून येते. मानसिक प्रवृत्ती जर सेवेची नसेल तर त्या माणसांकडून सेवेची काय अपेक्षा करणार? कायदा व सुव्यवस्थेला लाचखोरी ही लागलेली एक प्रकारची कीड आहे. त्याची मनोवृत्ती सेवेची नसून ती पैशाच्या मागे धावणारी असते एवढे मात्र निश्चित.
आजच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख कामगिरी बजावली पाहिजे, अशा सूचना केल्याचे समजते. तसेच अधिकाऱ्यांना काही कानपिचक्याही दिल्याचे समजते. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था काही ठिक नाही. दोन महिने झाले मागासवर्गीय तरुणांची इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली म्हणून हत्या करण्यात आली. त्यात चार आरोपींना पकडण्यात आले. परंतु राहुल सोनवणे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. राहुल सोनवणे हा कंत्राटदार असून तो कसा काय सापडत नाही? तो आपली सर्व कामे जिथे आहे तिथे बसूनच करतोय. पण पोलिसांना कसा काय सापडत नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे. जुगार, मटका, फोफावला आहे. पंधरा दिवसात एक-दोन खून होतात. वाळू माफीयांची चलती आहे. कोणाच्यातरी आशीर्वादाशिवाय वाळू माफीयांची तस्करी सुरू असणे शक्यच नाही. तोच प्रकार गौण खनिजासंदर्भातला आहे. अमली पदार्थांची तस्करी पोलिसांच्या सहाय्याने सर्रास सुरू आहे. त्यातील पोलीस अधिकाऱ्याचीही तशीच नियंत्रण कक्षात बदली केली जाते. पण अमली तस्करी काही केल्या थांबत नाही. जळगाव शहर आणि जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा धुमाकूळ आहे. चोपडा तालुक्यात त्याचा कारखानाच आहे असे म्हणतात. मध्यप्रदेशातून गावठी कट्टे जळगाव देतात आणि ते विकले जातात, असे म्हटले जाते. त्यावर पोलिसांचे नियंत्रण नको का? अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्यांना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणले जात नाही. अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांची बदली झाली. त्यांचे ठिकाणी गावित हे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत कितपत बदल होईल? हे लवकरच कळेल. त्यासाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या सारख्या घटना घडत असतील तर कायदा व सुव्यवस्थेचे दिंडवडेच निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पोलीस निरीक्षकच्या नियंत्रण कक्षातील बदलीने हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी कडक उपाययोजना केली पाहिजे..!

