लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावर्षी सर्वसाधारण सभेत जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील जे साखर कारखाने बंद पडले आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, असा मुद्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याला अनुसरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी असे जाहीर केले की, बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी कायदेशीर अडचणी आहेत. जिल्हा बँकेचे कर्ज थकीत केल्यामुळे हे कारखाने बंद आहेत. जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना आणि फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हे जिल्हा बँकेचे कर्ज थकल्यामुळे बंद पडले आहेत. ते चालू करण्यासाठी आता पुन्हा बँक कर्ज देऊ शकत नाही, म्हणून हे साखर कारखाने बंद आहेत.
त्यापैकी मधुकर सहकारी साखर कारखाना तीन वर्षांपूर्वी बँकेने लिलाव करून खासगी व्यक्तीला विकला. त्या विक्रीतून आलेले पैसे बँकेचे कर्ज नील करण्यासाठी वापरण्यात आले. तर कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी बंद पडला आहे. त्याची विक्री करण्याचा प्रयत्न झाला; पण तो प्रयत्न फसला आणि कारखाना बंद पडला. सध्या या कारखान्यावर मालकी जिल्हा बँकेची आहे; पण तो सुरू करता येत नाही. त्यासाठी राज्य सहकारी बँकेने एखाद्या कंपनीला कर्ज देऊन त्याचे पुनरुज्जीवन करता येते. पण त्यासाठी कोणीतरी कंपनी तयार व्हायला पाहिजे. जोपर्यंत अशी एखादी कंपनी तयार होणार नाही, तोपर्यंत त्याचे पुनरुज्जीवन शक्य नाही. ती कंपनी मिळत नाही, तोपर्यंत वसंत सहकारी साखर कारखाना पडून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद असल्याने त्याची मशिनरी खराब होत आहे. त्यामुळे हा कारखाना खासगी व्यक्तीने घ्यायला तयार नाही. परंतु, या साखर कारखान्याबाबत तो सुरू करण्याच्या दृष्टीने बँकेने काहीतरी पावले उचलली पाहिजेत, हे देखील तितकेच खरे आहे.
आज सहकार क्षेत्रात हा साखर कारखाना बंद पडल्यामुळे एरंडोल, पारोळा, भडगाव तसेच जळगाव तालुक्यातील हजारो शेतकरी या कारखान्यापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या ऊस उत्पादनाला मुकले आहेत. हा कारखाना सुरू होणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पण सर्वच जण म्हणतात की, जोपर्यंत राज्य सहकारी बँकेने त्याला कर्ज दिले नाही, तोपर्यंत तो सुरू होणार नाही. या कारखाना क्षेत्रातील जे कामगार होते, ते अनेक जण देशोधडीला लागले. त्यांनी हा कारखाना सुरू होईल, या आशेवर वाट पाहिली; पण तो सुरू झाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी नोकऱ्या पकडल्या, काही जणांनी स्वतःचे धंदे सुरू केले, तर काही जणांचे निधन झाले. अशा प्रकारे तेथील कामगारांची वाट लागली.
दुसरा कारखाना फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना. हा कारखाना विकला गेला. त्यात बँकेचे कर्ज नील करून कर्मचाऱ्यांची देणी फेडण्याची जबाबदारी त्या खासगी मालकावर टाकण्यात आली. परंतु, त्या खासगी मालकाने कर्मचाऱ्यांचे देणे पूर्ण केले नाही. त्यामुळे हा साखर कारखाना सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या. गेले तीन वर्षे झाले, हा साखर कारखाना सुरू होत नाही. त्यातून साखर निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खासगी मालकाला साखर कारखाना विकला असला तरी तो सुरू होत नाही. त्यामुळे त्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्यांपासून वंचित आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काय साध्य केले? कारखाना सुरू व्हावा, या दृष्टीने खासगी मालकाला तो विकला गेला; पण त्याच्या काही आर्थिक अडचणी असल्याने कारखाना सुरू होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील चोपडा वगळता इतर सर्व साखर कारखाने बंद अवस्थेत पडून आहेत. बेलगंगा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीने खरेदी केला; पण कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, म्हणून तो साखर कारखाना सुरू होत नाही. त्याचप्रमाणे रावेर येथील गणू महाजन यांचा ओंकारेश्वर साखर कारखाना तर सुरूच झाला नाही. सुरुवातीपासूनच त्यांची घरघर सुरू झाली. सध्या हा कारखाना खासगी व्यक्तीकडे विकला आहे; पण तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कोर्टकचेऱ्या सुरू आहेत.
अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यात चार साखर कारखाने सहकार क्षेत्रातले बंद असून, ते सुरू व्हावेत, याची प्रतीक्षा सुरू आहे. एकमेव चोपडा सहकारी साखर कारखाना खासगी क्षेत्रात खासगी मालकाच्या हुकूमशाहीप्रमाणे सुरू आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखान्यांची वाट लागली आहे आणि आमची जिल्हा बँक नुसते पाहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.


