
लोकशाही संपादकीय लेख
गेल्या पंधरा वर्षापासून जळगाव शहरातील महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम जळगाव महापालिकेत राबवली आहे. त्यात कालिंका माता मंदिर पासून ते अजिंठा चौफुली, इच्छा देवी चौक, आकाशवाणी चौक, खोटे नगर पर्यंत महामार्गावरील अतिक्रमणाचा सफाया केला. समांतर रस्त्यावर दोन्ही बाजूला चांगले पक्के अतिक्रमणे झाली होते. ती सर्व जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही अतिक्रमणे तात्पुरती काढली नाही तर ती पूर्णपणे काढून जप्त करून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने अतिक्रमण होण्याची संधी फार कमी आहे. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाचा सफाया झाला, परंतु आता शहरातील अतिक्रमणे काढणे हे काम उद्यापासून सुरू होणार आहे. शहरातील फुले मार्केट, बळीराम पेठ, चौबे मार्केट परिसर, सुभाष चौक परिसर, गोलाणी मार्केट येथील अतिक्रमणे काढणे मोठे जेकेरीचे आहे. फुले मार्केट मध्ये तर अतिक्रमणाचा इतका विळखा आहे की, तेथे ग्राहकांना रस्त्याने चालणे देखील मुश्किल होते. मुख्य दुकान कोणते आणि अतिक्रमण कोणते हे येथे समजतच नाही. त्यातच अतिक्रमणाचा विळखा पाहता वाट काढणे ग्राहकांना मुश्किल होते. ग्राहकांच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहतात. ग्राहकांच्या पर्स, किमती वस्तू चोरीला जातात. त्याला जबाबदार कोण? फुले मार्केटमध्ये अतिक्रमण धारकांची मजुरी फार चालते. त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडतो. फुले मार्केटमध्ये एकूण 234 अतिक्रमण धारक हे रजिस्टर अतिक्रमणधारक आहेत. रजिस्टर अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देणे महापालिकेवर बंधनकारक आहे. जेथे जेथे अतिक्रमण झोन करण्यात आले आहे. तेथे अतिक्रमणधारक थांबत नाहीत. अतिक्रमण झोन सोडून दुसऱ्या ठिकाणी ते थांबतात. कारण त्यांचा व्यवसाय अतिक्रमण झोन मध्ये चालत नाही, म्हणून ते मुख्य ठिकाणी गर्दी करतात. त्यासाठी या रजिस्टर अतिक्रमणधारकांना वेगळ्या जागा मुकार्रर करण्याची गरज आहे. पण नवीन ठिकाणी जोपर्यंत ग्राहकांची वर्दळ होत नाही तोपर्यंत व्यवसाय चालत नाही. एकदा ग्राहकांची वर्दळ सुरू झाली की त्यांचा व्यवसाय आपोआप चांगला चालतो. त्याचे उत्तम उदाहरण आहे, ते खाऊ गल्लीचे. खाऊ गल्ली सुरुवातीला महानगरपालिकेच्या गल्लीत आणण्यात आली, तेव्हा ग्राहकांची वर्दळ कमी होती. पण एकदा तेथे सवय झाली की आज खाऊ गल्ली मध्ये गर्दी मावत नाही. तो ग्राहकांच्या सवयीचा भाग आहे. म्हणून अतिक्रमण झोन जेथे केले जाईल तेथे अतिक्रमण धारकांचा व्यवसाय जोमाने सुरू होईल यात शंका नाही. परंतु आज जी फुले मार्केट मधील अतिक्रमणे आहेत ती फार मोठी डोकेदुखी आहे. अनेक लोकनियुक्त महानगरपालिका सदस्यांनी पूर्ण प्रयत्न करूनही ते अतिक्रमण हटवण्यास ते असमर्थ ठरले आहेत. त्याचा दोष अतिक्रमण विभागाचाही आहे. अतिक्रमणाची गाडी सकाळी 11 ते 12 पर्यंत थांबली की त्यानंतर तेथून निघून जाते. या गाड्या गेल्या की पाच मिनिटात अतिक्रमणधारक तेथे आपला व्यवसाय थाटतात. हा ऊन सावलीचा खेळ चालू असतो. अतिक्रमण विभागाला अतिक्रमण धारकांकडून जो मलिदा मिळतो त्यामुळे अतिक्रमण विभाग त्याला कानाडोळा करतात ही वस्तुस्थिती आहे.
महापौर दीपमाला काळे यांची अतिक्रमण काढण्याबाबत स्वच्छ भूमिका आहे. त्यात त्यांना कितपत यश येते हे पाहायचे आहे. कसलीही भिडभाड न ठेवता दिपाली दीपमाला काळे या अतिक्रमण काढत आहेत. पण काही मोठ्यांचे अतिक्रमणाबाबतीत थोडा सॉफ्ट कॉर्नर ठेवला जातोय, तो ठेवता कामा नये. मोठे दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर काही अतिक्रमण केले असेल तर ते तितक्यात ताकदीने काढण्याची हिंमत महापौरांनी ठेवली पाहिजे. लोक संघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आरोप केला आहे की, स्वतःच्या पतीच्या नावावर असलेल्या इम्पेरियल हॉटेल येथे पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून ती पार्किंगची जागा लग्न समारंभासाठी देण्यात येते. ते जर खरे असेल तर ते दीपमाला काळे यांनी काढले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. प्रतिभा शिंदे म्हणतात इम्पेरियल हॉटेलचे अतिक्रमण काढण्यासाठी मी प्रशासनाला मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आत ते नाही काढले तर मी उपोषणाला बसणार आहे. काशिनाथ लॉज येथे झालेले अतिक्रमण देखील तातडीने काढावे, अन्यथा त्यासाठी मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे. अतिक्रमण काढण्याला आमचा विरोध नाही. अतिक्रमणे काढून शहर स्वच्छ केलेच पाहिजे. परंतु धनदांडग्यांची अतिक्रमण काढायचे नाही आणि ज्यांची रोजी रोटी अतिक्रमणावर आहे, त्यांना मात्र उघडे करायचे हे कसले तंत्र आहे? आम्ही हे चालू देणार नाही, असे प्रतिभा शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसलाही भीडभाड न करता सर्वांचे अतिक्रमण काढणे हे होय..!

