लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविराम कराराची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. या घोषणेनंतर जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर कच्च्या तेलांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅलर १०० डॉलरच्या खाली आली आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आणि त्यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट’ क्रूड प्रति बॅरल ९५ डॉलर्सवर पोहोचले आहे. तसंच आता युद्धविरामामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पूर्ववत होईल. त्यामुळे जगभरातील इतर देशांमध्ये असलेले इंधनाचे संकट दूर होऊन पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील.
युद्धविरामाची घोषणा भारतासाठी आनंदवार्ता ठरली आहे. कारण इराण-अमेरिका युद्धामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक बंद असल्यामुळे ऑइल टँकर येण्यास अडथळे येत होते. परिणामी भारतात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीची तुटवडा निर्माण झाला होता. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून ऑइल टँकर्सला दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी सुरक्षितपणे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इराणमधून भारतात कच्च्या तेलाची होणारी आयात सुरळीत होईल. परिणामी भारतातील इंधन पुरवठा व्यवस्थित होईल.

