लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडी सध्या वेगाने सुरु आहेत. राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश मिळालं. पण तरी अद्याप सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नाही. त्यातच आता दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना एक विनंती केली आहे.
महायुतीत सध्या महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. त्यातच काल झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना थेट उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.
आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे बोललं जात आहे. तसेच पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंना केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच कोणाला कोणती मंत्रिपद दिली जाणार, यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रिपदाची मागणी केली.
दरम्यान काल झालेल्या बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यानंतर सत्तास्थापन आणि मुख्यमंत्रीपदावर अंतिम निर्णय होईल, असे बोललं जात आहे.