लोकशाही विशेष लेख

मुंबईची लाईफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गेल्याच महिन्यात एका २२ वर्षीय युवकाची लाईफ लाइन कायमची तुटली. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून एक नराधमाने मयंक लोहार नावाच्या तरुणाची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केली. ही घटना घडत असताना ट्रेनमध्ये अनेक प्रवासी उपस्थित होते. त्यापैकी काहींनी या घटनेचे फोटो काढले तर काहींनी व्हिडीओ बनवले; मात्र कोणीच मयंकच्या मदतीला धावून गेले नाही. फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्यांनी आपापले मोबाईल खिशात ठेवून संघटितपणे मारेकऱ्याला वेळीच पकडले असते तर कदाचित मयंक वाचलाही असता.
मयंकचा खून करून आरोपी बिनधास्त उतरून चालत स्टेशनबाहेर पडला. त्याला शोधण्यासाठी समस्त रेल्वे आणि शहर पोलीस यंत्रणा कामाला लागली. तो जात असताना पाठीमागून त्याच्यावर झडप घालण्याचीही कोणाची हिम्मत झाली नाही. आज पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहण्यात आला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वात गजबजलेल्या दादर स्टेशनवरील हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत रेल्वे रुलनजीक एक इसम एका महिलेला निर्दयपणे मारहाण करताना दिसतो आहे. यावेळी रेल्वे स्थानकावर अनेक जण या घटनेकडे पाहताना दिसत आहेत; मात्र कोणीही तिच्या मदतीला धावले नाही.
पहिल्या घटनेत गुन्हेगाराच्या हातात सुरा होता मात्र या दुसऱ्या घटनेत मारहाण करणाऱ्या इसमाच्या हाती कोणतेही शस्त्र नसताना कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ केव्हाचा आहे, मारहाण करणारा इसम कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र या दोन्ही घटनेतून मुंबईकरांची भावनाशून्यता प्रकर्षाने दिसून आली. आपल्या डोळ्यासमोर कुणाचा तरी जीव जात असताना, एका अबला असाहाय्यतेने विव्हळत असताना त्यांच्या मदतीला धावून जाण्याची कोणालाच का बरे इच्छा झाली नाही. लोकांच्या भावना इतक्या बोथट झाल्या आहेत का ?
या दोन्ही घटना पाहता २०२३ च्या दिल्लीतील दोन घटनांची प्रकर्षाने आठवण झाली. पियुष पाल नावाचा एक ३० वर्षीय युवक नेहमीप्रमाणे दिल्लीतील आऊटर रिंग रस्त्याने मोटारसायकल वरून जात असताना मागून येणाऱ्या बाईकचा धक्का लागल्याने खाली पडून जखमी झाला. डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागून गंभीर जखमी झालेला पियुष लोकांकडे मदतीसाठी याचना करू लागला मात्र कोणीच त्याच्या मदतीला पुढे आले नाही. उलट काहीजण त्याचा व्हिडीओ बनवत राहिले. त्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरला, चोराने पियुषचा मोबाईल हिसकावला तेव्हा पीयूषच्या घरातून त्याच्यासाठी फोन आला होता मात्र चोरट्याने तो कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून तिथून पळ काढला. त्यावेळी तो फोन उचलला असता, तर कदाचित पीयूषच्या मदतीला त्याचे नातेवाईक धावून आले असते. मात्र स्वार्थापुढे भावना मेलेल्यांना त्याचे सोयरसुतक ते काय असणार !
अर्धा तास रस्त्यावर विव्हळत पडलेल्या पियुषला अखेर पंकज जैन नावाच्या एका इसमाने अन्य ३-४ लोकांच्या मदतीने रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत माळवली होती. मृतवत समाजाचे दर्शन घडवणारी ही दिल्लीतील दुसरी घटना. याआधी २८ मे २०२३ ला दिल्लीच्या शहाबाद डेअरी परिसरात साक्षी नावाच्या एका १६ वर्षीय मुलीची साहिल नामक तरुणाने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.
रहदारीच्या परिसरात ही घटना घडत असताना बाजूने अनेक जण ये-जा करत होते मात्र त्यापैकी कोणीच साक्षीच्या मदतीला धावून आला नाही. यावेळी जेवढी चर्चा या हत्याकांडाची झाली तेव्हढीच चर्चा माणसातील हरवत चाललेल्या माणुसकीची झाली. साक्षी मदतीसाठी जिवाच्या आकांताने विव्हळत होती; मात्र बाजूने जाणारे लोक तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे करत पुढे जात होते, हे साऱ्या देशाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहिले. त्यापैकी २-४ जण जरी साक्षीच्या मदतीला धावून गेले असते, तरी साक्षी आज जिवंत असती.
मात्र ‘ती दुसऱ्याची मुलगी’, ‘माझी कोणीच नाही’, ‘मी का तिच्या मदतीला जाऊ’, ‘इतरही आजूबाजूला लोक आहेत ते जात नाहीत, तर मी का जाऊ ?’ ‘मी पुढे गेलोच तर उद्या पोलीस मला त्रास देतील, कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील त्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.’ या वैचारिक वादळातून त्यावेळी आजूबाजूने जाणारे अनेक जण गेले असतील, पण त्यांच्या या विचारांच्या रणकंदनावर त्यांच्यातील विवेकाला मात करताच आली नाही. साक्षीच्या जागी माझी मुलगी, माझी बहीण असती, तरी मी असाच दुर्लक्ष करून पुढे गेलो असतो का, असा विचार त्यावेळी कोणाच्याच मनाला शिवला नाही परिणामी भर रस्त्यात साक्षीचा नाहक खून झाला या खुनाला हे बघेही जबाबदार आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशा घटना केवळ दिल्ली आणि मुंबईत घडतात असे नव्हे प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात हीच स्थिती आहे. मी भला आणि माझे घर भले, समाजात काही बरे वाईट घडतेय तर त्याचे मला काय ? अशी कूपमंडूक वृत्ती मानवांत तयार होऊ लागली आहे. आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, किंबहुना समाजामुळेच आपले अस्तित्व आहे. समाजस्वास्थ चांगले राहिले तरच आपले स्वास्थ चांगले राहील. आज समाजातील एखाद्या घटकाच्या मदतीला आपण धावून गेलो तर उद्या समाज आपल्या मदतीला धावून येईल. हे आपल्या केव्हा लक्षात येणार ? शालेय जीवनात ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी प्रतिज्ञा आपण प्रतिदिन घेतो; मात्र आपल्या बांधवांवर-भगिनींवर संकट ओढवते तेव्हा या प्रतिज्ञेचा आपल्याला विसर कसा पडतो ?
भगवंताने मानवाला बुद्धी दिली आहे, मन दिले आहे, विवेकही दिला आहे, त्याचा वापर आपण केवळ आपल्या स्वार्थासाठीच करणार आहोत का ? इतरांना साहाय्य करण्याच्या गोष्टी आपण शालेय पुस्तकांत वाचल्या आहेत. गरजवंताला साहाय्य करण्याचे महत्व सांगणाऱ्या रिल्सही आपल्या मोबाईलवर पाहिल्या आहेत; मात्र जेव्हा एखाद्या अनोळखी असह्हायत्याला मदत करण्याचा प्रसंगओढवतो, तेव्हाच आपल्यातील माणुसकीची खरी कसोटी लागते.
जगन घाणेकर
घाटकोपर, मुंबई
मो. ९६६४५५९७८०


