लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहर आणि जिल्ह्यात गेल्यावर्षभरापासून होणाऱ्या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. किडे मुंग्यांसारखे चिरडले जावेत त्याप्रमाणे लोकांचा चिरडून अपघातात मृत्यू होतोय. नुकताच बुधवार घातवार ठरला आहे. खराब रस्ते बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताची मालिका खंडित होत नाही. जळगाव शहरातील निमखेडी रोडवर काल दोन सख्ख्या भावांचा तर मुक्ताईनगर येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रोज होणाऱ्या अपघातात कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. जळगाव मधील दोन सख्खे भाऊ तर मुक्ताईनगर येथे महामार्गावर ट्रॅव्हल आणि ट्रकच्या धडके दोघांचा मृत्यू आणि 32 जण जखमी झाले. ट्रॅव्हल अपघातात मृत्युमुखी पडले त्यात एक सुरतचा तर एक जण राजस्थानचा आहे. जखमी हे बुलढाणा येथील असल्याचे कळते. ही ट्रॅव्हल बस मध्य प्रदेशातील सिहोर येथून बुलढाणा येथे जात होती. सर्व जखमींची सुद्धा नावे जाहीर करण्यात आली आहेत. म्हणजे मृत्यू झालेल्या तसेच जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांना होणारा त्रास त्यांचा त्यांनाच माहीत. जिल्ह्यातील या वाढत्या अपघाताला जबाबदार कोण? अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे काही पावले उचलली जाणार आहेत की नाही? वाढत्या अपघाताच्या मालिका नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन काहीच करत नाही. जळगाव शहरातून जाणाऱ्या खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतचा चौपदरी हायवे तर मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर अपघात नाही असा दिवस जात नाही. आकाशवाणी चौकातील रोटरी सर्कल, इच्छादेवी चौकातील सर्कल आणि अजिंठा चौक सर्कल हे अत्यंत सदोष बनवले आहेत. हे सर्व बनवल्यापासून त्या विरोधात ओरड सुरू आहे. येथे होणाऱ्या वाहनांची कोंडी आणि होणारे अपघात हे त्याचे पुरावे आहेत. ज्या दिवशी अपघात होतो तेव्हा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी भेट देऊन संवेदना व्यक्त करण्यापलीकडे काही करत नाहीत. त्यांच्या नियंत्रणासाठी पर्याय शोधण्याऐवजी नुसत्या संवेदना व्यक्त केल्याने हा प्रश्न सुटणार नाही.
खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर रस्ते केले तर वाहतूक कोंडी थांबून अपघात टळतील. परंतु समांतर रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला असताना, त्यासाठी निधीचीही तरतूद झाली असताना हे समांतर असते का होत नाहीत? त्यासाठी एकाच कारण सांगितले जाते.. समांतर रस्त्यातील अतिक्रमणामुळे समांतर रस्ते बनविले जात नाहीत. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना महापालिका ही अतिक्रमणे का काढत नाही? महापालिकेच्या निष्क्रिय आयुक्त आणि प्रशासनाला कोण पाठीशी घालतो आहे? शहरातील अतिक्रमणे काढण्याची जणू आपली जबाबदारीच नाही या थाटात महापालिका वावरते. या मागचे खरे कारण काय? सध्या शहरातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस गाजतो आहे. या मोकाट कुत्र्यांनी अनेकांचे लचके तोडले. शेवटी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर महापालिकेला जाग आली. शहरातील रस्त्यांची कामे रेंगाळल्याने वाहनधारकांचे किती हाल होत आहेत? याची सूतराम कल्पना महापालिकेला नाही. नागरी सुविधा देण्यासाठी महापालिका असताना नागरिकांची गैरसोय महापालिका करते. या महापालिके विषयी कोणी कडक भूमिका घेत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे फावते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून याबाबत तोडगा काढण्याची गरज आहे. तीन ते चार मंत्री जिल्ह्याला लाभले असताना त्यांचा काय उपयोग?
लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाहीत. एका आढावा बैठकीत पालकमंत्र्यांसमोर शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याशी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ज्या मुजोर पद्धतीने संवाद साधला त्याला काय म्हणावे? आणि आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र चुपी साधून ऐकण्यापलीकडे काही करत नव्हते. या मागचे कारण काय? हे जनतेला कळत नाही, एवढी जनता दूध खुळी नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाहीत, याचे एकमेव कारण पालकमंत्र्यांशी त्यांची असलेले हे निकटचे संबंध होय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जळगाव शहरातील रस्त्यांमुळे जळगावकरांचे हाल होत असतील तर त्यांचे पालकमंत्र्यांना काय घेणे देणे? जळगाव शहरातील अपघाताची मालिका खंडित व्हायची असेल तर लवकरात लवकर तरसोद पाळधी बायपास सुरू होणे आवश्यक आहे. परंतु अनेक तारीख पे तारीख जाहीर होऊन सुद्धा तरसोद पाळधी बायपास सुरू होत नाही. एक मेपासून हा बायपास कुठल्याही परिस्थितीत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. आता आणखी दोन महिने वाढवून देण्यात आले. म्हणजे अख्खा पावसाळा हा बायपास काही सुरू होत नाही, हे निश्चित. पावसाळ्यातील वाहतूक कोंडीमुळे अपघातात अधिक वाढ होईल. त्यामुळे अधिकारी पुढारीच याला जबाबदार आहेत. अपघातात जे मृत्युमुखी पडतात त्यांचे कुटुंबीयांवर काय बितते, याचे अधिकारी आणि पुढार्यांना काही सोयरे सुतक नाही..!

