लोकशाही संपादकीय लेख
जळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वात जुने असे बालगंधर्व खुले नाट्यगृह लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बालगंधर्व खुले नाट्यगृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अनेक नाटके या सभागृहात झाली आहेत आणि अद्यापही होत असतात. सदर बालगंधर्व नाट्यगृहाची चांगली सुधारणा महापालिकेच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून झाली आहे. तथापि महापालिकेच्या वतीने रंगकर्मींची मागणी काही केल्या मान्य झालेली नाही. महापालिकेच्या मालकीचे हे खुले नाट्यगृह असल्याने स्वस्त दरात सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी सर्वसामान्यांना मिळू शकते. तथापि महापालिकेकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. बालगंधर्व खुले नाट्यगृह बंदिस्त करून महापालिकेने काही सोयी उपलब्ध करून केल्या असत्या तर शहराची सांस्कृतिक चळवळ फोफावली असती. सांस्कृतिक चळवळ वाढण्यास मदत झाली असती, पण महापालिकेला त्याचे काही घेणेदेणे नाही, या अविर्भावात बालगंधर्व नाट्यगृह सुसज्ज बनण्यापासून कोसो दूर राहिले आहे.
शहरातील एका चांगल्या सुसज्ज अशा छत्रपती संभाजी नाट्यगृह माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कार्यकाळात पूर्ण झाले. तथापि या छत्रपती संभाजी नाट्यगृहाचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. आज या नाट्यगृहाचा मेंटेनन्स करण्यासाठी जनता सहकारी बँकेकडे देण्यात आले आहे. तथापि अलीकडे या संभाजी नाट्यगृहातील वातानुकूलित विभाग कधीकधी काम करीत नसल्याने सभागृहात बसलेल्या प्रेक्षकांचे हाल होत होते. तसेच या सभागृहाचे अव्वाच्यासव्वा भाडे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक वेळा या सभागृहात कार्यक्रम होण्याऐवजी ते बंदच असते. मुंबई पुणे येथील नाटकांचे प्रयोग होण्यासाठी हे सभागृह उत्तम आहे. तथापि महागड्या भाड्यामुळे नाटकांचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. म्हणून ज्यांना सांस्कृतिक क्षेत्राची आवड आहे, त्यांना त्या सभागृहात नाटक अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे त्यांच्या खिशाला परवडणारे नाही, ही वस्तुस्थिती आहे.
काल रविवार रोजी बालगंधर्व खुले नाट्यगृहात ज्या चार जणांवर मद्याची पार्टी करण्यात रंगले असताना महापालिका कर्मचाऱ्यांनी तसेच पोलिसांनी धाड टाकली तेव्हा चार पैकी दोन जण पसार झाले. दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. बालगंधर्व खुले नाट्यगृहात जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्या सभागृहात मध्याची पार्टी होते, ही बाब जळगाव शहर महापालिकेच्या दृष्टीने लांच्छनास्पद आहे. गेल्या अनेक वर्षापासून बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे बंदिस्त आणि सुखसोईंनी युक्त असे नाट्यगृह बनवायला हवे होते. तथापि सांस्कृतिक चळवळ वाढण्याबाबत महापालिकेला काय घेणेदेणे? बालगंधर्व खुले नाट्यगृहाची देखभाल करणे हे महापालिकेचे कर्तव्य असताना त्या सभागृहाला वाऱ्यावर सोडून दिले जाते, ही दुर्भाग्याची बाब म्हणावी लागेल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढी मोठी जागा अलीकडे उपलब्ध होणे कठीण आहे. अशा सभागृहाला बालगंधर्व या नावाला साजेसे असे सुंदर सुखसुईंनी युक्त सभागृह बनवणे महापालिकेला काही अवघड आहे, अशातला भाग नाही. तथापि बालगंधर्व या खुले नाट्यगृहाची व्यवस्थित देखभाल सुद्धा महापालिकेतर्फे करण्यात येत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
सांस्कृतिकतेचा ठेवा जपण्यासाठी बालगंधर्व खुले नाट्यगृह सुसज्ज बनविण्यासाठी यापुढे तरी प्रयत्न होतील का? बालगंधर्व खुले नाट्यगृहाला लागून महापालिकेच्या मालकीची कोंडवाड्याची खुली जागा आहे. वर्षानुवर्षे हा कोंडवाडा तेथे आहे. आता त्या कोंडवाड्याची इथे खरंच आवश्यकता आहे का? असेल तर एवढ्या मध्यवर्ती ठिकाणी त्याची जागा ठेवणे आवश्यक आहे का? बालगंधर्व खुले नाट्यगृहाची नव्याने पुनर्रचना करून चांगले नाट्यगृह बांधले तर कोंडवाड्याच्या जागेत कलाकारांसाठी काही खोल्या बांधून चांगली व्यवस्था होऊ शकते. परंतु कोणीही याबाबतीत कसला विचार करत नाही. मग अशा पद्धतीने या जागेचा मद्य पार्टी व इतर बाबींसाठी दुरुपयोग होतो. जळगाव महानगरपालिकेसाठी ही बाब निषेधार्ह आहे. याची पुढे तरी दखल घेतली जाईल का..?