बाजारात वादळापूर्वी शुकशुकाट : सेन्सेक्स-निफ्टी सपाटअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरियावर 25 टक्के आयात शुल्क लादणारे दोन्ही देशांना पत्र पाठवले आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकन बाजारात घसरण दिसून आली आणि वॉल स्ट्रीटचे तिन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले तर, आशियाई बाजारांमध्येही सुरुवातीला चढ-उतार पाहायला मिळाले. त्याचवेळी, भारतासोबत अमेरिकेचा व्यापार करार होण्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असून शेअर मार्केटमध्ये वादळापुर्वी शुकशुकाट पसरला आहे.
देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट पसरला आहे. बाजाराची कमजोर सुरुवात झाली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स 65 अंकांनी घसरून 83 हजार 377.10 वर उघडला. तर दुसरीकडे, एनएसई निफ्टीने 0.06 टक्के घसरून 25 हजार 446.60 वर ओपनिंग केली. त्याचवेळी, आजच्या व्यवहारादरम्यान टायटन कंपनी, टाटा मोटर्स, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल, रेफेक्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स फोकसमध्ये असतील.

बाजारात खरेदी वाढली
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरियासह 14 व्यापारी भागीदारांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा केली व त्यानंतर चर्चेसाठी आपण अजूनही तयार असल्याचे जाहीर केल्यावर आशियाई बाजारांमध्ये बहुतांश हिरवळ पसरली. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.36 टक्के वधारला, तर टॉपिक्स निर्देशांक 0.31 वाढून ट्रेड करत आहे. त्याचवेळी, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.44 टक्के आणि कोस्डॅक 0.19 टक्के वधारला असून हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक फ्युचर्सने कमकुवत सुरुवात दर्शवली.
अमेरिकन शेअर मार्केट धडाम
राष्ट्रपतींनी टॅरिफबाबत घेतलेल्या या निर्णयांचा परिणाम सोमवारी अमेरिकन शेअर बाजारावर दिसून आला. वॉल स्ट्रीटमध्ये घसरण दिसून आली असून डाऊ जोन्स आणि एस अँड पी 500 सुमारे एक टयांनी घसरले. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय बाजारावर परिणाम दिसून येऊ शकतो. मात्र, ट्रम्प यांनी भारताबाबत सकारात्मक संकेत दिले आणि दोन्ही देशांमधील व्यापार कराराच्या शक्यतेमुळे बाजारालाही पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारावर परिणाम करणारे इतर काही घटक आहेत, ज्यावर गुंतवणूकदारांची नजर असेल.

