लोकशाही विशेष लेख
५५ वर्षे !! हो ५५ वर्षे झाली मला शाळा सोडून. पण अजूनही आठवणी जशाच्या तशा ताज्या झाल्या.. मला जर आज कोणी विचारलं की माझ्या शाळेनं मला काय दिलं? तर मी तर म्हणेन की मला शाळेनं जे दिलं ते मोजता न येण्यासारखं धन आहे. आणि तेही असं की त्याला कोणी चोरून पण नेणार नाही, ते लोकांना कितीही वाटलं तरी न संपणारं धन आहे. उलट ते आणखी वृद्धिंगत होत जातं
आज मी आपणाला जे चार शब्द लिहून पाठवतेय ते पण माझ्या शाळेकडूनच मिळालेलं वरदान आहे. आज मला जेष्ठ लेखिका, कवयित्री, साहित्यिकेचा मान सन्मान मिळातोय तो पण मला माझ्या शाळेनेच मिळवून दिला. माझ्या साठी ही अनमोल देणगी आहे. शाळेकडून. म्हणून मी माझ्या शाळेला कधीच विसरू शकणार नाही.
शाळा नसती तर अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडत धडपडले असते. जगातील घडामोडी, जगात काय चाललंय कधी कळलंच नसतं आज शिक्षणाच्या जोरावर नवीन तंत्रज्ञानाने मानव चंद्रावर, मंगळावर जाऊन पोचला. ते शिक्षण, ज्ञान शाळेनच दिलं आम्हाला. थोर संत, कवी, जगाचा इतिहास, भूगोल, पैशांचा व्यवहार, गणित, हे सर्व शाळेतच शिकायला मिळालं.
मला तर वाटतं, शाळा ही अशी बॕंक आहे की वयाच्या ६ व्या वर्षी खात उघडलं तर आता ७७ व्या वर्षापर्यंत ज्ञानाच फिक्स डिपाॕझिट केलं तर त्याचं एवढं चक्रवाढ व्याज मिळतंय, की ते व्याजच पुरेस आहे. ज्ञान रूपी धनाची रकम जशीच्या तशी तर आहेच. चक्रवाढ व्याजाचे चक्र फिरून फिरून कितीतरी पटीने वाढत आहे. की ते ज्ञान कितीही वाटलं तरी तहहयात संपणार नाही. असं धन मला शाळेनं दिलं, की मी आज जगात ज्ञानाने सर्वात श्रीमंत आहे असेच समजते.
अजूनही आठवते ती छोट्याशा खेड्यातील ग्रामपंचायतीची कौलारू शाळा. समोर मोठ्ठ पटांगण, त्यातच छोटीशी सुंदर बाग, त्याला मेंदीचं कुंपण. वा-याची झुळूक आली की बरोबर मेंदीचा मंद सुगंध घेऊन यायची खूप प्रसन्न वाटायचं. शाळा नसती तर अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडत थडपडत राहिले असते.
मी माझ्या शाळेची खूप खूप ऋणी आहे. तिनं मला जे दिलं ते मी इतरांपर्यंत पोचवण्याचा यथासांग प्रयत्न करत राहीन म्हणजे थोडं का होईना ऋणमुक्त होईन. पण हल्ली खूप वाईट दिवस आले आहेत माझ्या शाळेला. मराठी शाळा जवळ जवळ ओसच पडत चालल्या आहेत.
शाळा बंद, करायची वेळ आली आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्याला मराठी शाळेतूनच शिक्षण द्यायचे अशी नम्र विनंती करते. आमच्या काळातील विद्यार्थी ग्रामापंचायीतीच्या शाळेत शिकून मोठे पदाधिकारी झाले. ही गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायला हवी आणि आपल्या पाल्यांना पण याची जाणीव करून द्यायची. तर मराठी शाळा जीवंत राहातील. माझ्या शालेय जीवनाचे चित्र डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

ठाणे
मो. ८४५१०९६३४९