भाजपच्या बंडखोरांची हकालपट्टी! शिवसेनेच्या बंडखोरांचे काय?

0

लोकशाही संपादकीय लेख 

ळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे सहा आणि शिवसेनेचे सहा उमेदवार असे एकूण 12 उमेदवार निवडून आल्यानंतर महापालिकेची ही निवडणूक महायुतीसाठी एकदम सोपी आणि एकतर्फी होईल असे वाटत होते. तथापि प्रचाराला सुरुवात झाली आणि भाजप शिवसेनेच्या ज्या निष्ठावंत उमेदवारांना उमेदवारी नाकारली गेली ते अपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. त्या अपक्ष उमेदवारांमुळे प्रचारात रंग भरला आणि भाजप तसेच शिवसेना अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढविले. महापालिका प्रचारांच्या दुसऱ्या टप्प्यात अपक्ष उमेदवारांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजपकडून अखेर निष्ठावंत म्हणविणाऱ्या बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारून एकूण 27 भाजपच्या बंडखोरांवर पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेऊन भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी गुरुवारी सायंकाळी अधिकृत नोटीस जारी केली. बंडखोरांवरील या कारवाईमुळे भाजपने महायुतीतील आपल्या मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक प्रकारे खुश केले आहे. बंडखोरांवर केलेल्या भाजपच्या या कारवाईत भाजपचे निष्ठावंत म्हणविणारे महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचा समावेश आहे. जितेंद्र मराठे यांनी तिकीट नाकारल्यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून आपली अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रचारात एंट्री घेतली. भाजपच्या निष्ठावंतांना डावलून आयारामांना भाजपचे तिकीट दिल्यामुळे निष्ठावंत मतदारांची सहानुभूती मिळत असल्याचे चित्र निर्माण केले. आता त्यांच्यावर भाजपची कारवाई झाल्याने भाजपकडून त्यांना छुपी मदत मिळते आहे, असा केला जाणारा दावा उघड झाला आहे आणि ते उघडे पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना त्यांच्या कमळ चिन्हामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थात भाजपने ज्या सत्तावीस बंडखोरांवर कारवाई केली आहे त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होईल की तोटा हे चित्र स्पष्ट होण्यासाठी निवडणूक निकालाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाजपचे निष्ठावंत म्हणून या बंडखोर उमेदवारांनी आपल्या निवडणूक प्रचारात जो मुद्दा जाहीर केला होता. त्याबाबत मात्र ते उघडे पडले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये जितेंद्र मराठे यांना शह देण्याचा राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर यांचा मार्ग सुकर झाला आहे.

 

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने आपल्या बंडखोर उमेदवारांवर हकालपट्टीची कारवाई केली. त्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या पक्षातील बंडखोरांवर कारवाई करावी, ही अपेक्षा आहे. परंतु त्या कारवाईची वाट पाहिली जात आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख स्वप्निल परदेशी यांनी पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करून अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवत भाजपमध्ये नुकताच प्रवेश करून भाजपची उमेदवारी मिळविणाऱ्या नितीन बरडे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण करण्याचा डाव टाकला आहे. परंतु शिवसेनेतर्फे बंडखोरांवर कारवाई केली तर शिवसेनेच्या निष्ठावंतांना मिळणारी सहानुभूती मिळणार नाही. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराला फिरणार नाही. पण सेनेतर्फे बंडखोरांवर कारवाई करण्याची गरज आहे. एकंदरीत भाजप शिवसेनेच्या निष्ठावंत बंडखोरांकडून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढविल्यामुळे महायुतीला सोपी आणि एकतर्फी वाटणारी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत रंगत भरली आहे. त्यातच भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव मधील रोड शोमुळे जे शक्तिप्रदर्शन आणि वातावरण निर्मिती झाली तशी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रद्द झालेल्या जळगाव दौऱ्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचे जे शक्तिप्रदर्शन व्हायला होत हवे होते ते झाले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत भाजपतर्फेच शक्ती प्रदर्शन झाले. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेची सोपी असलेली निवडणूक निष्ठावंतांच्या बंडखोरीमुळे अवघड झाली आहे. प्रचार आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून प्रचारात चांगलीच रंगत भरली आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.