राज्यात गारठा वाढला; जळगाव ८ अंशावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या राज्यात गारठा वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसा ऊन असतानाही गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवत आहे. तर नाशिक, धुळे, जळगाव, यवतमाळ व अहमदनगर या भागांत थंडीच्या लाटेसारखी स्थिती होती.

थंड वातावरणाची अनुभूती

राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. दरम्यान सोमवारी (ता. २१) यवतमाळ आणि अमरावती येथे थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वरसारखी थंड वातावरणाची अनुभूती आता विविध जिल्ह्यांमध्ये येत आहे. रविवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ८.५ अंश सेल्सिअस झाली.

थंडीचा कडाका कायम

पुढील तीन ते चार दिवस राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट अपेक्षित आहे. त्यामुळे थंडीचा कडाका असाच कायम राहू शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून ही प्रणाली रविवारी कराईकलपासून ६३० किलोमीटर पूर्वेकडे तर, चन्नईपासून ६७० किलोमीटर आग्नेयेकडे होती. दरम्यान मंगळवारपर्यंत (ता. २२) ही प्रणाली तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची चिन्हे आहेत.

थंडीची स्थिती
– मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी घट
– राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी घट
– मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट
– पुढील चार दिवस तापमानातील घट कायम
– उत्तरेकडे होत असलेला पाऊस/बर्फवृष्टीमुळे राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडी कायम

या शहरातील पारा कमी
जालना – १२
नांदेड – १२.४
जळगाव – ८.५
सातारा – १२.६
नाशिक – ९.८
परभणी – ११.५
औरंगाबाद – ९.२
बारामती – १०.१
पुणे – ९.७
उदगीर – १०.८
गोंदिया – १०.४

Leave A Reply

Your email address will not be published.