मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील तापमानात घट झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. तरी, राज्यात सरासरीपेक्षा कमी थंडी आहे. तापमानात घट झाली असल्याने राज्यात थंडी थोड्याफार प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी तापमानात 2 ते 3 अंशाने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढू शकते, अशीही शक्यता आहे.
उत्तर भारतात तापमानात सतत बदल होत आहे. पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात थंडी कमी-जास्त होत आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरचं निच्चांकी तापमान 6.1 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. तर, राजस्थान आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. वायव्य भारतात 145 नॉट्स वेगाने वारे वाहत असून उत्तर भारतात तापमानात सतत चढ-उतार जाणवत आहे. राज्यातील बऱ्याच भागात थंडी वाढली आहे. तर, काही ठिकाणी सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे. काही भागांमध्ये किमान तापमानात किंचित वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. निफाडमधील गहू संशोधन केंद्रामध्ये 11 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. तर, मुंबईत सध्या 25.32 अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 21.99 अंश सेल्सियस आणि 26.94 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी 9.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात 9.9 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात बऱ्याच भागात वाढलेले तापमान कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थंडी वाढू शकते.