लोकशाही न्यूज नेटवर्क
रेंगाळलेल्या मान्सूनची वाटचाल काल सायंकाळी दमदार स्वरुपात झाली खरी पण यामुळे जळगाव जिल्हयात बहुतांशी भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. नवीन लागवड केलेला कापुस, भुईमुग, मका या पीकांनाही या पावसाचा फटका बसला. मृग नक्षत्रात वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने अनेक घरावरची पत्रे उडून गेली. कित्येकांचे संसार उघडयावर आले.
पाचोरा भडगांव भागात तुफानी पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी, कष्टकरी, चाकरमानी या सर्वांना त्याने पळता भूई केली. गाळण बु. ॥ येथील शेतकरी कैलास बारकू पाटील या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर विज पडून ते ठार झाले. शेतातले काम संपता संपत नाही. दोघ पती पत्नीपैकी अस्मानी संकट पतीवर ओढवले आणि पत्नीने जो आकांत मांडला तो काळीज चिरुन टाकणारा होता. जामनेर-नेरी परिसरालाही या पहिल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. काल गुरुवारी जामनेरचा बाजार असल्याने दुकानदार, भाजीपाला विक्रेते व खरेदीदार ग्राहकांनाही या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
धुळेचे लोट वादळवारा व पाऊस यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाचा पंजाब डख या संस्थेने केलेला अंदाज मात्र खरा ठरला. यंदा 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज पावसाबाबत काढण्यात आला आहे, तो तंतोतंत खरा ठरल्यास देशांतर्गत खरीप हंगाम जोरदारपणे येईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. पावसाबाबत आपण त्याला साकडे घालतांना एकच म्हणून शकतो:-
देवा तुझ्या करणीला आलं
हिरवं सपान माझ्या धरणीला
हा मृदगंध असा कसा रे …
वर्षातून एकदाच येतो भुईला ….!
– काव्यसंग्रह चांदणवेडा