जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुसऱ्याचे दुःख आपले दुःख मानून सेवाकार्य करीत, आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडीत आयुष्य सार्थकी लावावे असे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे माजी प्रांतपाल किशोर केडिया (अमरावती) यांनी प्रतिपादन केले. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये शनिवार ३० रोजी रात्री झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या १९ व्या चार्टर दिन (स्थापना दिन) सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष जितेंद्र बरडे, मानद सचिव ॲड केतन ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना केडिया यांनी रोटरी जळगाव सेंट्रलच्या सर्व अध्यक्षांनी १९ वर्षात सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत सेवा कार्याचा वटवृक्ष उभा केला आहे. सर्व माजी अध्यक्ष म्हणजे विविध क्षेत्रातील यशस्वी हिरे आहेत असे सांगितले. रोटरी क्लब अमरावतीच्या अनेक प्रकल्पांची माहिती देत रक्ततुला सारख्या अभिनव उपक्रमातून तिथे रक्तदानाची मोठी चळवळ उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी जळगाव सेंट्रलने बेवारस मृत प्राण्यांसाठी शववाहिका प्रकल्प साकार करावा असे शेवटी केडिया यांनी आवाहन केले.
या सोहळ्यात रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र जैन, डॉ.अंजूम अमरेलीवाला, कमलेश वासवानी, विष्णू भंगाळे, डॉ. राहुल मयूर, डॉ. अपर्णा भट – कासार, राजेश चौधरी, विपुल पारेख, कल्पेश शाह, जतिन ओझा तसेच माजी सचिव जितेंद्र अग्रवाल, सुनील पाटील, सुरेश जैन (कांकरिया) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. परिचय कमलेश वासवानी यांनी तर आभार राजेश चौधरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. अशोक पाध्ये, महेंद्र गांधी, श्यामलाल कुकरेजा, अजय जैन, अनिल वर्मा, ॲड. रवींद्र कुलकर्णी, डॉ. मिलिंद पाटील, अजित वाणी, चंद्रकांत साळुंखे, संजय वाघ, ललित मलारा, साधना दामले, अनिता बरडे, पल्लवी ढाके तसेच रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.


