लोकशाही संपादकीय लेख

मुक्ताईनगर तालुक्यात ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणातील पाणी सोडण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय झाला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला. गेल्या अनेक वर्षापासून ओझरखेडा तलावात हातनुर धरणाचे पाणी सोडून ओझरखेडा परिसरातील शेतीचे सिंचन करावे अशी मागणी स्वतः चंद्रकांत पाटील हे करीत होते. त्यासाठी त्यांनी दोन वर्षापासून आंदोलनही केले. ओझरखेडा तलावाच्या पाण्यात जाऊन जलसमाधी घेण्याचे आंदोलन त्यांनी केले होते. त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून यावर्षी नुकतेच त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ओझरखेडा तलावात हतनूरचे पाणी सोडण्यामुळे ओझरखेडा आणि हरताळे परिसरातील शेती सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर भुसावळ तालुक्यातील काही गावांची शेती त्या तलावाच्या सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. ओझरखेडा परिसर हरताळे परिसर आणि भुसावळ तालुक्याचा काही भागातील शेतीला आता ओझरखेडा तलावाचे पाणी मिळणार असल्याने या भागातील शेती आता हिरवीगार होणार आहे. या ओझरखेडा तलावात हतनूरचे पाणी सोडावे, ही फार जुनी मागणी होती. त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचाही पुढाकार होता. परंतु आमदार चंद्रकांत पाटलांनी त्यासाठी पुढाकार घेतल्यापासून खडसे यांनी आपले अंग काढून घेतले. त्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू होती पण चंद्रकांत पाटलांनी त्यासाठी बाजी मारली आणि हतनुर धरणाचे पाणी ओझरखेडे तलावात आणण्याचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले. असो… त्यांचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. चार दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले. त्याचबरोबर तापी पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी देखील एक निवेदन दिले. त्या निवेदनाचा आधार घेऊन शेवटी हातनुर धरणाचे पाणी कालव्यांद्वारे ओझरखेडा तलावात सोडण्यात आले. ओझरखेडा तलावातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरचे थकीत वीज बिलही माफ करून घेण्यात आमदार चंद्रकांत पाटलांना यश आले आहे. त्यामुळे आता या परिसरात शेतकरी ओझरखेडा तलावातील पाणी शेतीसाठी वापरू शकतील. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आता समृद्धी होईल यात शंका नाही. ओझरखेडा तलावात हतनूर धरणाचे पाणी आणल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना धन्यवाद दिले आहेत त्यांचे आभार मानावे ते आमच्यासाठी थोडेच आहे असे म्हटले आहे. आमदार चंद्रकांत पाटलांनी मुक्ताईनगर मतदार संघापुरता संकुचित विचार केला नाही. त्यामुळे भुसावळ तालुकातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. येथे फक्त मतदार संघापुरता विचार न करता सर्वांचाच विचार केला हे महत्त्वाचे आहे. हा आमचा.. तो तुमचा.. असा विचार न करता ओझरखेडे तलावातील पाण्याचा लाभ मुक्ताईनगर तालुक्याबरोबरच भुसावळ तालुक्यालाही मिळणार आहे, हे विशेष होय. त्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे..!


