दोनशेहून अधिक जण ठार ; महिलांचेही केले अपहरण
तेल अवीव : एकमेकांचे हाडवैरी असलेल्या इस्रायल व पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना ‘हमास’ मध्ये पुन्हा भीषण युद्धाचा भडका उडाला. गाझापट्टीतून हमासने शनिवारी सकाळी इस्त्रायलवर अचानक ५ हजारहून अधिक रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात इस्रायलच्या ४० नागरिकांचा मृत्यू झाला, तर ७५० हून अधिक जण जखमी झाले. युद्धाची वेळ आली असून कधी विचारही केला नसेल अशी किंमत हमासला मोजावी लागेल, असा गंभीर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला.
हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलनेही हमासच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत १९८ पॅलेस्टिनी ठार झाले, तर १६०० हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स हल्ल्यास पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी घरात घुसून खुलेआम कतली करून महिलांचे अपहरण केल्याची प्रकार दिसून आला आहे.
इस्रायलमध्ये सुट्टीचा दिवस असताना हमास संघटनेने या देशावर जमिनी, हवाईं आणि सागरी आघाडीवरून जोरदार हल्ला चढवल्याने युद्धाला तोंड फुटले. गाझापट्टीतून सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हमासने इस्त्रायलच्या तेल अवीव, स्टेरोट आणि अश्कलोनसह ७ शहरांना लक्ष्य करत ५ हजारहून अधिक रॉकेट हल्ले केले. गत काही वर्षांतील इस्त्रायलवरील हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. हमासचा नेता मोहम्मद दाइफ याने ही बदल्याची आणि आरपारची लढाई असल्याचे घोषित करत पॅलेस्टाईनमधील लोकांना युद्धात उतरण्याचे आवाहन केले आहे. जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे सांगत हमासने इस्रायलविरोधातील या मोहिमेला ‘अल अक्सा स्टॉर्म ‘नाव दिले आहे. या भीषण हल्ल्यात इस्रायलमधील अनेक इमारती, वाहने उद्ध्वस्त झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पॅराशूटच्या मदतीने दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करत अंदाधुंद गोळीबार केला. हमासने इस्त्रायलच्या काही नागरिक व सैनिकांना बंधक बनवले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायल सैन्याने प्रत्युत्तराची जोरदार कारवाई सुरू केली आहे. प्रत्युत्तराच्या या अभियानाला इस्त्रायलने ‘आयर्न ‘स्वॉर्ड’ असे नाव दिले आहे. ही युद्धाची वेळ असून यात आपलाच विजय होईल, असा विश्वास इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळासोबतच्या आपत्कालीन बैठकीनंतर नेतन्याहू यांनी देशवासीयांना संबोधित केले. ही युद्धाची वेळ आहे आणि ते आपण जिंकणार आहोत. शत्रूला अशी किंमत मोजावी लागेल की त्यांनी त्याचा कधी विचारदेखील केला नसेल. आपला देश व नागरिकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला जाईल, असा इशारा नेतन्याहू यांनी हल्ल्याच्या पाच तासांनंतर दिला. देशात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठेचण्याचे आदेश सैनिकांना देण्यात आले आहेत. राखीव सैन्याला देखील मैदानात उतरवण्यात आल्याचे स्पष्ट करत नेतन्याहू यांनी नागरिकांना सैन्याच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर इस्त्रायलच्या सुरक्षेची खात्री अमेरिकेकडून केली जाईल, असे अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, इस्रायल आणि हमासमधील संघर्षाने यापूर्वीही अनेकदा रक्तरंजित वळण घेतले आहे. २००८ साली पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलकडून २२ दिवसांचे लष्करी अभियान उघडण्यात आले होते. शस्त्रसंधीपूर्वी या युद्धात इस्रायलचे १३, तर पॅलेस्टाईनमधील १४०० जणांचा बळी गेला होता. २०१२ साली इस्त्रायलने हमासच्या लष्करी स्टाफचा प्रमुख अहमद जबारीला ठार मारले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी ८ दिवस होता. संघर्ष सुरू २०१४ साली हमासने तीन इस्त्रायली अल्पवयीनांचे अपहरण करत त्यांची हत्या केली होती. यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या ७ दिवसांच्या संघर्षांत इस्रायलच्या ६७ सैनिकांसह ७३ जणांचा मृत्यू झाला.
आम्ही इस्त्राईल सोबत-नरेंद्र मोदी
इस्रायलवरील हमासच्या भीषण हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटात भारत इस्रायलसोबत असल्याचे म्हटले. इस्रायलवर हल्ला हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे नमूद करत मोदींनी त्याचा कठोर शब्दात निषेधकेला. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध झालो आहे. आमच्या भावना आणि प्रार्थना निर्दोष पीडित कुटुंबासोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत, असे ट्विट मोदींनी केले.