वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती !
निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट !
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा बीड सायबर शाखेतील निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे हे गौप्यस्फोट केले.
कासले म्हणाले, “मी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. कोर्टाने त्या प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले. मात्र अशा चौकशांमधून सत्य समोर येत नाही. केंद्र सरकारची यंत्रणा बसवावी लागेल, तेव्हाच खरी माहिती बाहेर येईल.”
ते पुढे म्हणाले, “माझ्यावरही वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आली होती. मी सायबर शाखेत असलो तरी मी हे करू शकतो, हे माहीत असल्यानेच मला ही ऑफर देण्यात आली. अशा एन्काऊंटर्ससाठी १०, २०, अगदी ५० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचं आमिष दाखवले जाते.”
कासले यांच्या दाव्यानुसार, फेक एन्काऊंटर घडवण्यासाठी उच्च पातळीवर बैठका होतात. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह सचिव अशा मंडळींच्या गुप्त बैठकीत ही योजना ठरवली जाते. त्यानंतर निवडक अधिकाऱ्यांची टीम तयार केली जाते. या पथकाला मोठ्या रकमा देऊन एन्काऊंटरचे काम दिले जाते आणि नंतर त्यांचे रक्षण केले जाते,” असंही त्यांनी नमूद केलं.
त्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “त्याच्या हातात बेड्या होत्या, दोरखंडाने हात-पाय बांधलेले होते. तरीही एन्काऊंटर करण्यात आलं, हे बोगस होतं,” असा दावा त्यांनी केला.
निलंबित झाल्यानंतर कासले सतत सोशल मीडियावर सक्रिय असून, विविध मुद्द्यांवर थेट आरोप करणारे व्हिडिओ ते पोस्ट करत आहेत. वाल्मीक कराड प्रकरणातील त्यांच्या या नवीन खुलाशामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.